NGN News
Latest Marathi News

एकनाथ शिंदेंची ‘ती’ भेट केसरकरांच्या आग्रहास्तव : विखे- पाटील

  • खरातबाबत शिंदे तेव्हा अनभिज्ञ असल्याचा दावा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डीला आले होते तेव्हा मंत्रीपदावर असलेल्या दीपक केसरकर यांनी आग्रह केल्यामुळे आम्ही सगळे अशोक खरातला भेटायला ईशान्येश्वर संस्थानात गेलो होतो, असा खुलासा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे मध्यम संवादादरम्यान केला. एकनाथ शिंदेंना अशोक खरातबाबत काहीच माहिती नव्हती. ते मला म्हणाले की, एके ठिकाणी जायचे आहे. अशोक खरातबाबत माहिती असती तर ते तिकडे गेले असते का, असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला.

मंत्री विखे म्हणाले, खरात प्रकरणात आम्ही पहिला गुन्हा दाखल केला म्हणून हे प्रकरण उघडकीस आले. अनेक महिला अशोक खरातच्या वलयाला बळी पडल्या. अंजली दमानिया यांनी जे आरोप केले आहेत, त्याबाबतचे सत्य चौकशीत समोर येईल. आपल्या भागातील माणूस देवाचा अवतार आहे, असे समजून शिर्डीतील काही लोक बळी पडले. पण यासाठी लोकांना दोष देऊ नये, असेही विखे-पाटील यांनी म्हटले.

कोणीही असले तरी कारवाई व्हावी

समता पतसंस्था प्रकरणात जबाब नोंदवले गेले आहेत. अशोक खरात स्वतः अकाउंट उघडायचा आणि ऑपरेट करायचा. अनेक महिलांना फसवण्यात आले. अज्ञानाने घडलेल्या गोष्टी आणि माहिती असून जाणे, यामध्ये फरक आहे. इथून पुढे कोणी भविष्य सांगायला आलं, तर आधी त्याचं भविष्य बघावं लागेल. रोज नवीन प्रकार समोर येत आहेत. जे दोषी असतील, ते मोठ्या पदावर असतील तरी कारवाई झाली पाहिजे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. 

Comments are closed.