
- गणेश गीतेंचे सूचक, अनुमोदक अडचणीत
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत पक्षाच्या वाटेला जागा नसताना उमेदवारी दाखल करणारे गणेश गीते तसेच त्यांच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करणारे भाजप नगरसेवक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या या कृतीबाबत पक्षाने खुलासा मागितला आहे. पक्ष नेतृत्वाच्या सूचनेनुसार, शहराध्यक्ष सुनील केदार यांनी खुलाशाची मागणी केल्याची माहिती आहे.
कुंभमेळा मंत्री यांचे निकटवर्तीय म्हणून मानले जाणारे गीते यांनी शनिवारी पक्षाकडून कोणताही आदेश नसताना उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर ९ भाजप नगरसेवकांनी सूचक आणि अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. जागावाटप जाहीर झालेले नसताना गीते यांची ही कृती पक्ष नेतृत्वाने गांभीर्याने घेतली आहे. त्याच अनुषंगाने प्रदेश नेतृत्वाने या नगरसेवकांकडे खुलासा मागितला आहे.
८ दिवसांची मुदत : केदार
दरम्यान, यासंदर्भात शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितले की, गणेश गीते आणि स्वाक्षरी करणारे नगरसेवक यांची कृती समर्थनीय नाही. पक्ष नेतृत्वाने कोणतेही निर्देश दिलेले नसताना आणि स्थानिक नेतृत्वाला अंधारात ठेवून या नगरसेवकांनी परस्पर स्वाक्षरी देणे गैर आणि पक्षशिस्तीला छेद देणारे आहे. या नगरसेवकांना येत्या ८ दिवसांत खुलासा करण्यास सांगितले आहे. त्यांच्यावरील कारवाईचा निर्णय प्रदेश स्तरावरून घेतला जाईल.
नेमक्या कोणाच्या स्वाक्षऱ्या ?
गणेश गीते यांच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी करणारे भाजप नगरसेवक पुढीलप्रमाणे :
१. दिनकर पाटील २. संगीता घोटेकर ३. नितीन निगळ ४. प्रशांत दिवे ५. आदिती पांडे ६. सुरेश पाटील ७. राजेंद्र आहेर ८. सोनाली भंदुरे ९. रंजना भानसी (माजी महापौर)
Comments are closed.