
- विरोधकांनी कच खाल्लेली असताना महायुतीतील बेबनाव उघड
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत सोमवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या घडामोडींनी राजकीय वातावरण ढवळून निघाले. विरोधकांच्या सवतासुभ्यात नाशिकची जागा वाटेला आलेल्या शिवसेना उबाठा पक्षाने ऐनवेळी उमेदवार न देण्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार नसल्याने पक्षाने माघारीचा पवित्रा घेतल्याचे सांगण्यात आले असले महायुतीच्या लेखी मविआने मोठा पराभव समोर दिसत असल्यानेच माघार घेऊन कच खाल्ल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजपकडून उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेल्या गणेश गीते आणि गोकुळ गीते या बंधूनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने महायुतीतील बेबनाव उघड झाला आहे.
नाशिक मतदारसंघ संख्याबळाच्या जोरावर भाजपच्या वाटेला येईल, असा आत्मविश्वास असल्याने अनेकांनी रिंगणात उतरण्याची तयारी केली होती. त्यामध्ये गणेश गीते यांनी आपल्याला नेतृत्वाने शब्द दिल्याचा दावा केला. तथापि, हा मतदारसंघ राजकीय वाटाघाटीत शिवसेनेला गेल्याने भाजप इच्छुकांचा भ्रमनिरास झाला. सेनेने येवल्याच्या नरेंद्र दराडे यांना पुन्हा मैदानात उतरवले. यामुळे भाजपसह शिवसेनेतील इतर इच्छुकांचा हिरमोड झाला. तथापि, इतरांनी अर्ज न भरता अनुपस्थित राहून नाराजी दर्शवली, तर गणेश आणि गोकुळ या गीते बंधूनी अपक्ष अर्ज भरून महायुतीच्या एकोप्याला छेद दिला. पैकी गणेश गीते हे श्रेष्ठींच्या दबावानंतर माघार घेवू शकतात. मात्र, गोकुळ गीते हे भाजपशी थेट संबंधित नसल्याने मैदानात कायम राहून दराडे यांना आव्हान देतील, अशी चर्चा आहे.
‘उबाठा’ची धक्कादायक माघार
महाविकास आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी विधान परिषदेच्या सर्व जागा लढण्याची घोषणा केली होती. नाशिकमध्ये मात्र वेगळाच निर्णय घेत स्थानिक नेत्यांनी या घोषणेला सुरुंग लावला. नाशिक मतदारसंघ वाट्याला आलेल्या शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने माजी आमदार वसंत गीते आणि अनिल कदम यांची नावे उमेदवारीसाठी घेतली जात होती. पक्षाचे नेते रवींद्र मिर्लेकर नाशकात दाखलही झाले होते. मात्र, घोडेबाजार टाळण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार नसल्याने आम्ही माघार घेत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. या निर्णयामुळे त्यांच्याच पक्षात नाराजी पसरल्याची चर्चा आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत ते तटस्थ राहतात, अपक्ष किंवा समविचारी इस्लाम पार्टीला मतदान करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Comments are closed.