
- स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहाची सांगता; 50 लाख सेवेकऱ्याचं श्रीगुरुचरित्र पारायण
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : अमेरिका, इस्राईल, इराण या देशांमधील संघर्षामुळे आज संपूर्ण जग अस्वस्थ असून जगाची तिसऱ्या महायुद्धकडे वाटचाल सुरु आहे. वाढता संघर्ष आणि युद्धामुळे भारतावर सुद्धा अनेक प्रकारची गंभीर संकटे ओढवणार असल्यामुळे आजपासूनच देशभरातील करोडो सेवेकऱ्यांनी भारतमाता आणि जगाला विनाशापासून वाचविण्यासाठी विविध अध्यात्मिक सेवेच्या माध्यमातून माता भगवती व श्री स्वामी समर्थ महाराजांना साकडे घालावे असे आवाहन गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे यांनी केले.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग प्रधान केंद्र दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर येथील समर्थ गुरुपीठ यासह देश व विदेशातील हजारो केंद्रावर स्वामी समर्थ पुण्यतिथी अखंड नामजप, यज्ञ सप्ताहाची सांगता आज स्वामी पुण्यतिथी दिनी करण्यात आली.यनिमित्ताने दिंडोरीतील प्रधान केंद्रात उपस्थित सेवेकऱ्यांशी हितगुज करताना त्यांनी हे आवाहन केले.
गत सात दिवसापासून सुरु असलेल्या अखंड नामजप, यज्ञ सप्ताहात आबालवृद्ध सेवेकऱ्यांनी उन्हाच्या तडाख्यात सुद्धा विक्रमी सेवा रुजू केली.नाशिक शहरासह जिल्यात दीड लाख तर देशभरात व जगभरात 51लाख पेक्षा अधिक आबालवृद्ध सेवेकऱ्यांनी श्रीगुरुचरित्र या पावन ग्रंथाचे पारायण केले.
आज भल्या पहाटे पासून दिंडोरी, त्र्यंबकेश्वर सह सर्व समर्थ केंद्रावर सांगता सोहळ्याची लगबग दिसून येत होती. यज्ञविधी, आरती व इतर सेवा सकाळपासून संपन्न झाली. दिंडोरीत प पू अण्णासाहेब मोरे तर त्र्यंबकेश्वर गुरुपीठात चंद्रकांतदादा मोरे यांचे हस्ते आरती व इतर सेवा संपन्न झाली.
गेल्या आठवडा भरात देश व देशाबाहेर लाखो समर्थ सेवेकरी आणि भाविकांनी केंद्रात आणि आपापल्या घरी श्रीगुरुचरित्र, दुर्गासप्तशती, नवनाथ, भागवत, श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाची पारायणे केली.
दिंडोरी येथे उपस्थित सेवेकऱ्यांशी गुरुमाऊली प पू अण्णासाहेब यांनी हितगुज करताना देश व जगापुढे उभ्या असलेल्या भयानक संकटाबाबत चर्चा करून यातून भारत मातेचे रक्षण होण्यासाठी मोठया प्रमाणात सेवा रुजू करण्याबाबत आवाहन करीत असतानाच अनेक अध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय बाबींवर मार्गदर्शन केले. स्वामी कार्य आज संपूर्ण जगभर कसे फोफावत आहे आणि आजच्या अत्यंत विचित्र परिस्थितीत अनेक समस्यांवर स्वामी महाराज हेच उत्तर असल्यामुळे हे कार्य घराघरात पोचवण्यासाठी सेवेकऱ्यांनी प्रयत्न करावा, दोन पायांची केंद्र बनून सर्वत्र जनजागृती करावी असे आवाहन केले.
त्र्यंबकेश्वर येथे आकार घेत असलेल्या सद्गुरु मोरेदादा हॉस्पिटलच्या बांधकामाने जोर पकडला असून त्याचा काही भाग लवकरच रुग्णसेवेसाठी उभा राहील अशी घोषणाही प पू गुरुमाऊलींनी केली.या हॉस्पिटलच्या माध्यमातून लाखो गोरगरीब, गरजू रुग्णांना जगभरातील अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मोफत मिळणार आहेत.
सेवामार्गातील वेगवेगळ्या विभागाचा आढावा घेताना गुरुमाऊलींनी या सर्व सक्रिय सेवेकऱ्यांना भविष्यातील कार्याचे दिशादिग्दर्शन केले.मानव, समाज, राष्ट्र घडविण्यासाठी आपण नेमके काय करायचे आहे हा मंत्रच आज स्वामी पुण्यतिथी निमित्ताने गुरुमाऊलींनी दिला. दिंडोरीत स्वतः गुरुमाऊली तर त्रंबकेश्वर येथे चंद्रकांतदादा मोरे यांनी सपत्नीक यज्ञ विधित सहभाग घेतला. सर्व केंद्रावर दर्शन व महाप्रसादाचा लाभ लाखो सेवेकऱ्यांनी घेतला.
Comments are closed.