
** एनजीएन न्यूज नेटवर्क
पवित्र गोदामाईचे उगमस्थान, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, पितृकार्यासाठीचे पवित्र स्थळ, कुंभमेळा केंद्र अशी नाना बिरूदं लाभलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीचे धार्मिक अंगाने अनन्यसाधारण महत्व आहे. देश-विदेशांतील भाविकांचा बारमाही राबता असलेली ही नगरी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असल्याने देवस्थान आणि इथली आर्थिक नाडी ह्या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तथापि, अलीकडे काही मूठभरांमुळे इथे बळावलेली खिसेभरू वृत्ती सार्वत्रिक चर्चेचा भाग ठरते आहे. श्रध्देपोटी बाहेरून येणाऱ्या भाविकांना दर्शन घडवून आणणाऱ्या कथित किमयागारांच्या आर्थिक अभ्युदयाची खमंग चर्चा रंगत असतानाच चक्क देवस्थानचा विश्वस्तच त्यापैकी एक असल्याचे सप्रमाण सिध्द झाल्याने खळबळ माजणे स्वाभाविक आहे. व्हीआयपी दर्शन घडवण्याच्या नावाखाली या विश्वस्ताने मांडलेला दलालांचा बाजार पोलिसांच्या सजगतेमुळे उघड झाला. हे होणे गरजेचे होतेच. तथापि, एका विश्वस्ताचे पितळ उघडे होणे, हे तर केवळ हिमनगाचे टोक आहे, ही त्र्यंबकेश्वरवासियांची प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते. शिवाय, यानिमित्त चौकशीचा नुसता फार्स ठरू नये तर शहराला कलंंकित करणाऱ्या या दलालीचे समूळ उच्चाटन व्हावे, ही व्यापक अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची प्रचंड लूट होतेय, ही चर्चा तशी नवीन नाही. तथापि, या काळ्या कृत्यात सहभाग नोंदवणारे काही बहाद्दर शहराच्या व्हीआयपी यादीतीलच असल्याचे अलीकडील प्रकारावरून अधोरेखित झाले. त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त असलेला पुरूषोत्तम कडलग नामक व्यक्ती दलालांच्या एका टोळीचा ‘मुखिया’ असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले. दर्शनाच्या काळाबाजाराविरोधात पोलिसांनी राबवलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’ दरम्यान एक जोडगोळी तावडीत सापडली. तिने टोळीचा ‘म्होरक्या’ आमचा काका अर्थात पुरूषोत्तम कडलग हाच असल्याचा भंडाफोड केला. कडलग केवळ देवस्थानचा विश्वस्तच नाही तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा राज्यस्तरीय पदाधिकारी आहे. याचा अर्थ दुहेरी संरक्षण कवच लाभलेला हा विश्वस्त निर्ढावलेल्या वृत्तीने भाविकांचे आर्थिक शोषण करीत होता, हे स्पष्ट झाले.
रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना जलद म्हणजेच व्हीआयपी दर्शनाचे प्रलोभन दाखवणारी ही किमयागार टोळी ‘वसुली अधिभार’ अदा केल्यानंतर निष्कंटक मंदिर प्रवेश मिळवून देते, हा लाभार्थ्यांसाठी एक चमत्कारच ठरत असे. तासनतास रांगेत ताटकळत बसण्यापेक्षा थोडाबहुत खिसा खाली करून ‘इप्सितप्राप्ती’ करून घेणाऱ्या भाविकांची संख्याही कमी नसते. अशाच मानसिकता हेरून कडलग आणि त्याच्या टोळक्याचा गोरखधंदा सुरू होता, हे चौकशीदरम्यान उघड झाले. भाविकांच्या रांगेत शिरून हे टोळके ‘डील’ करत असल्याचे आणि जलद दर्शनाच्या नावाखाली तीन ते बारा हजार रूपयांचा मलिदा लाटत असल्याचेही स्पष्ट झाले. यावरून दलालांच्या कमाईची व्याप्ती लक्षात येते. खरेतर कडलग याचे पुतणेच रंगेहाथ पकडले गेल्याने तो या टोळीपुरता ‘मास्टरमाईंड’ असल्याचे सिध्द झाले. तथापि, यासंदर्भातील त्र्यंबकमधील दबक्या आवाजातील चर्चा बरेच काही सांगते. काहींच्या मते कडलग टोळीचे पकडले जाणे हे तर हिमनगाचे टोक आहे, तर काहींच्या मते सामाजिकदृष्ट्या ‘क्रीम’ समजल्या जाणाऱ्या काही घटकांकडे देखील चौकशी करणारे ‘हात’ पोहचायला हवेत. विलक्षण अभ्युदयाने सजलेल्या अनेकांच्या अज्ञात उत्पन्न स्त्रोताचा गाभा जलद दर्शन हाच असल्याचा ठाम दावा यापैकी काही करतात. मग या देवस्थानाच्या विश्वस्त मंडळात भाविकांसाठी राखीव जागांवर कब्जा करण्यासाठी उड्या का पडतात, ह्या मुद्द्याची उकल झाल्याविना राहत नाही.
त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांची लूट होते, या चर्चेला आता कडलग टोळीतील दलाल पकडले गेल्यानंतर बळ मिळाले आहे. पोलिसांनी ज्या पध्दतीने ही टोळधाड शोधण्याची ‘मोडस ओपरांडी’ राबवली, ती स्तुत्य आहे. तथापि, हाती लागलेली दलालांची टोळी केवळ एकच असेल अशी शक्यता कमी आहे. या गोरखधंद्यात अजून काही घटक दलाली करत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणूनच पोलीस प्रशासनाने केवळ एका कारवाईपुरते मर्यादित न राहता तीमध्ये सातत्य ठेवले तर दलालांचे प्रमाण घटणे शक्य होईल. दुसरे महत्वाचे म्हणजे विश्वस्तपदाची प्रक्रिया राबवताना भाविक प्रतिनिधी म्हणून राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती नकोत, ही दुरूस्ती देवस्थानने नियमावलीत करणे आत्यंतिक गरजेचे आहे. कारण आर्थिक आणि राजकीय पाठबळाच्या जोरावर ही मंडळी स्वत:ला मिरवून नंतर ‘वसुली’साठी कार्यप्रवण होतात, हा त्र्यंबकवासियांचाच रव आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट होते, हा डाग पुसायचा असेल तर देवस्थान विश्वस्त मंडळाला कर्तव्यकठोर निर्णयांचा पुरस्कार करण्याची अपरहिार्यता स्विकारावी लागेल. दरमहा किती भाविकांनी दर्शन घेतले, कोणी कोणाचे नाव सांगून ‘वाईल्ड कार्ड एन्ट्री’ मिळवली आदी बाबींचे ऑडीट होणे गरजेचे आहे. दर्शन परंपरा सुटसुटीत आणि पारदर्शी करण्यातूनच तीर्थक्षेत्रात घुसलेल्या लुटारूंना खड्यासारखे बाजूला फेकता येईल. मात्र, त्यासाठी कोणाचा मुलाहिजा बाळगणे अथवा नसता ‘सॉफ्ट कॉर्नर’ दाखवणे अव्यवहार्य ठरेल.
सारांशात, व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली त्र्यंंबकमध्ये सुरू असलेल्या गोरखधंद्याचा उलगडा होणे आणि त्याचा म्होरक्या थेट देवस्थानचा विश्वस्त असणे यासारखे दुसरे लांच्छन असू शकत नाही. विश्वस्त येतात आणि जातात, मात्र नाव स्थानिकांचे, संबंधित तीर्थक्षेत्राचे कलंकित होते. थोड्याबहुत आर्थिक लाेभापोटी मूठभरांचे कारनामे स्थानिकांच्या मूळावर उठू नयेत. भाविकांच्या भावनिक ब्लॅकमेलिंगमधून काळी कमाई करणाऱ्यांना कोणत्याही स्थितीत पाय राेवू न देण्याची जबाबदारी स्थानिक नागरिक, विश्वस्त मंडळ, पोलीस प्रशासन आदि व्यवस्थांची आहे. मात्र यासाठी धार्मिक स्थळ म्हणून शहराचा लौकिक ‘प्रधानस्थानी’ ठेवण्याच्या भूमिकेवर मतैक्य होणे अनिवार्य ठरावे, एव्हढेच यानिमित्त ..
Comments are closed.