
- दिशा उपक्रमाद्वारे १ लाख महिलांना सक्षम आणि प्रगत करण्याचा कंपनीचा उद्देश
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
अन्न आणि कृषी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गोदरेज अग्रोव्हेट लिमिटेड कंपनीने नेहमीच संशोधन आणि विकासावर भर दिला आहे. नुकतेच गोदरेज अग्रोव्हेट कंपनीने विमेन इन अग्रीकल्चर समिटच्या तिस-या आवृत्तीमध्ये नव्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. कंपनीकडून ‘दिशा’ या नावाने महिला करिअर प्रवेगक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रामध्ये सर्वसमावेशक आणि भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज असलेली टॅलेंट इकोसिस्टम निर्माण करण्याप्रती आपली वचनबद्धता सिद्ध करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. कृषी क्षेत्रातील महिलांच्या व्यावसायिक प्रगतीला वेग देणे, त्यांना नेतृत्व पदांसाठी सक्षम करणे, हा यामागील उद्देश आहे.
गोदरेज अग्रोव्हेटचा सीएसआर उपक्रम म्हणून दिशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ‘कॅम्पस-टू-कॉर्पोरेट फिनिशिंग स्कूल’ म्हणून डिझाइन करण्यात आला आहे. कृषी आणि तत्सम शाखांमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थिनींची रोजगारक्षमता वाढवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. हा कार्यक्रम विक्री कौशल्ये, संवाद कौशल्ये आणि व्यावसायिक सज्जता यांसारख्या उद्योगासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांवर भर देतो. या उपक्रमांमुळे विद्यार्थिनींना औपचारिक करिअरमध्ये पाऊल ठेवणे सोपे होईल, असा कंपनीचा ठाम विश्वास आहे. ‘वनएमएनबी फाऊंडेशन’ आणि ‘इक्का लर्निंग फाउंडेशन’ यांच्या
सहकार्याने राबवल्या जाणा-या या उपक्रमाने आतापर्यंत आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमधीन २७६हून अधिक विद्यार्थिनींना प्रशिक्षित केले आहे. यातील अनेक विद्यार्थिनींनी नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या संधी मिळवल्या आहेत. महिलांना कृषी क्षेत्रात सक्षम करण्याच्या दिशेने ही कंपनीची महत्त्वपूर्ण कामगिरी समजली जाते.
या कार्यक्रमाच्या अनावरणाप्रसंगी गोदरेज अग्रोव्हेटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया म्हणाले, “भारतातील कृषी आणि त्यासंबंधित संलग्न सर्व क्षेत्रे सध्या महत्त्वाच्या वळणावर आहेत. हे ध्यानात घेता शाश्वत वाढ, उत्पादकता आणि ग्रामीण समृद्धीला चालना देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उद्योगाच्या गरजांनुसार सक्षम मनुष्यबळ तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. ‘दिशा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही कुशल महिला व्यावसायिकांची भक्कम फळी निर्माण करत आहोत. कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या पदांवर या महिला दैदिप्यमान कामगिरी करतील. आपल्या देशातील सुमारे ५० टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. या क्षेत्राचे बळकटीकरण व्हावे, महिलांचा सहभाग वाढावा याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत.”
दिशा उपक्रमाबद्दल गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या शाश्वतता आणि सीएसआर विभाग प्रमुख पाकजान दस्तूर म्हणाल्या, “गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपमध्ये सर्वसमावेशकता हा आमच्या प्रगतीचा आणि जडणघडणीचा मुख्य आधार आहे. ‘दिशा’ उपक्रम याच वचनबद्धतेचे प्रतिबिंब असून, याद्वारे आम्ही महिलांना संघटित कृषी उद्योगात सामील होण्यासाठी आणि रोजगाराच्या अर्थपूर्ण संधी मिळवण्यासाठी सक्षम करत आहोत. या प्रायोगिक प्रकल्पाने भागीदारीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. या उपक्रमातील ३३ टक्क्क्यांहून अधिक महिलांनी कृषी उद्योगातील विविध पदांवर आपली जागा निश्चित केली आहे. याचा आम्हांला अभिमान वाटतो. भविष्यात ही संख्या वाढत जाईल, याची आम्हांला खात्री आहे. “
या उपक्रमाबद्दल बोलताना गोदरेज अग्रोव्हेटच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी मल्लिका मुत्रेजा म्हणाल्या, “कंपनीतील मनुष्यबळ भक्कम तसेच सर्वसमावेशक असावे याकरिता प्रत्येक टप्प्यावर सतत गुंतवणूक असावी लागते. आम्ही गोदरेज अग्रोव्हेटमध्ये करिअरच्या सुरुवातीपासून ते नेतृत्वाच्या पदांपर्यंत महिलांना सक्षम बनवण्यावर भर देतो. दिशा आणि भरतीविषयक आणि विकासाशी संबंधित अनेक कार्यक्रमांचे आयोजन हे आमच्या महिलांच्या करिअरचा अर्थपूर्ण मार्ग करण्याप्रती असलेली वचनबद्धता दर्शवतात. आम्ही या प्रयत्नांतूनच भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज असलेले लवचिक कार्यपद्धतीचे मनुष्यबळ तयार करत आहोत. यामुळे कृषी विकासाला नवी दिशा मिळेल.”
दिशा कार्यक्रमाचा शुभारंभ हा गोदरेज अग्रोव्हेटच्या व्यापक संकल्पाचा भाग आहे. या क्षेत्रात १ लाख महिलांना सक्षम आणि प्रगत करण्याचा कंपनीचा उद्देश आहे. कंपनीने आतापर्यंत कौशल्य विकास, शिष्यवृत्ती, करिअरच्या सुरुवातीला मिळणारे मार्गदर्शन आणि नेतृत्व विकास यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून ६३ हजार ३०० हून अधिक महिलांना करिअरच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. हा उपक्रम महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे. महिलांना कृषी क्षेत्रात कुशलता प्राप्त व्हावी, तसेच त्यांच्या माध्यमातून व्यावसायिक मनुष्यबळ निर्माण व्हावे, याकरिता कंपनी नेहमीच प्रयत्नशील राहील.
Comments are closed.