
- 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी; ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे हजेरी
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर, आज मंगळवारी अशोक खरातला ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला येत्या 18 एप्रिलपर्यंत म्हणजेच 5 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात खरातच्या गुन्ह्याची व्याप्ती विषद केली. आरोपी स्वतःला देवाचा अवतार म्हणवून महिलांना जाळ्यात ओढत होता. महिलांना तांब्याच्या भांड्यातील पाणी आणि पेढा खाऊ घालायचा, ज्यात गुंगीचे औषध मिसळलेले असायचे. मी देवाचा अवतार आहे. माझ्याशी संबंध ठेवल्याने तू पवित्र झाली आहे, असे सांगून तो महिलांचे लैंगिक शोषण करायचा. गुंगीच्या औषधात नेमके काय मिसळले होते आणि या भोंदूगिरीसाठी तो कोणत्या रत्नांचा वापर करत होता, याचा शोध घेण्यासाठी 5 दिवसांच्या कोठडीची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
तथापि, खरातचे वकील ॲड. सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला विरोध केला. मागील गुन्ह्यांमध्येही पोलिसांनी असाच युक्तिवाद केला होता आणि तो तपास झालेला आहे, त्यामुळे पुन्हा कोठडीची गरज नाही, असा दावा त्यांनी केला. मात्र, सरकारी पक्षाने हा गुन्हा वेगळ्या महिलेशी संबंधित असून तपास महत्त्वाचा असल्याचे सांगितल्याने न्यायालयाने 5 दिवसांची कोठडी मंजूर केली.
सुनावणी दरम्यान तांत्रिक बिघाड
सुरक्षेच्या कारणास्तव खरातला आज प्रत्यक्ष न्यायालयात न आणता ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे हजर करण्यात आले. सुरुवातीला तांत्रिक अडचणीमुळे न्यायालयाचा आवाज खरातपर्यंत पोहोचत नसल्याने सुनावणी काही काळ थांबवावी लागली होती. तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर सुनावणी पुन्हा सुरू झाली.
धक्कादायक पैलू समोर येणार ?
खरातवर आतापर्यंत अनेक महिलांनी अत्याचार आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. अनेक विधवा आणि विवाहित महिलांना त्याने आपल्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे. आता नवीन गुन्ह्यात मिळालेल्या 5 दिवसांच्या कोठडीत खरातच्या ‘मोडस ऑपरेंडी’चे आणखी काही धक्कादायक पैलू समोर येण्याची शक्यता आहे.
Comments are closed.