NGN News
Latest Marathi News

दर्शनाचा काळाबाजार अंगलट; त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त गजाआड

  • पुरुषोत्तम कडलग याला त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून अटक; विश्वस्तानेच बाजार मांडल्याने संताप व्यक्त

** एनजीएन न्यूज नेटवर्क

त्र्यंबकेश्वर : दर्शनासाठी आलेल्या भाविकाची व्हीआयपी दर्शन नावाखाली आमिष दाखवून फसवणूक प्रकरणात त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त तथा राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग याला गजाआड करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, भाविकाला व्हीआयपी दर्शन मिळवून देतो, या आमिषाखाली गेल्या शनिवारी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यामधील एक संशयित आरोपी गोटीराम मनाजी पेहरे (रा. खडकवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) यास अटक करण्यात आली होती तर दुसरा संशयित अभिषेक कडलग (रा. त्र्यंबकेश्वर) हा फरार झाला होता. तथापि, स्थानिक पोलिसांना या काळ्याबाजारामध्ये विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांचा सहभाग असल्याचे धागेदोरे हाती लागले होते. त्यावरून पोलीसांनी सोमवारी रात्री पुरुषोत्तम कडलग यांस अटक केली. मंदिर संस्थानच्या विश्वस्तानेच अशा प्रकारे दर्शनाचा बाजार मांडल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 

@ त्र्यंबकेश्वर येथे विविध ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी येतात. यात २०० रुपये व्हिआयपी दर्शनासाठी ट्रस्टकडून शुल्क आकारण्यात येते. मात्र, तत्काळ दर्शन व्हावे यासाठी काही एजंट काम करत होते. यासाठी ३ हजार ते १२ हजार रुपये घेत होते, असे आम्हाला कळले. मंदिर समितीचे अध्यक्ष आणि न्यायाधीश यांच्याकडून कारवाईचे आदेश मिळाले होते. त्यानंतर आम्ही स्टिंग ऑपरेशन करत भाविकांना ३००० रुपये घेऊन कसे लुटले जाते याचे रेकॉर्डिंग केले. भाविकांची आर्थिक लुट केल्याप्रकरणी काल रात्री मंदिर समितीचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये वेगवेगळे लोक असून, आणखी काही ट्रस्टी असतील तर चौकशी केली जाईल.

  • बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक

Comments are closed.