NGN News
Latest Marathi News

काळ्या करामतींचा ‘कॅप्टन’ ! ( सारीपाट/मिलिंद सजगुरे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या हिंदोळ्यावर झुलणारा आजचा समाज सामाजिक-आर्थिक अंगांनी पुढारला असला तरी श्रद्धा-अंधश्रद्धेचे भूत त्याच्या मानगुटावर गारुड करून त्याला अश्मयुगात नेण्यास भाग पाडते, याची असंख्य उदाहरणे प्रत्ययास येतात. नाना प्रकारे प्रबोधनाचे ढोल वाजवून अंधश्रद्धेचा कडेलोट करण्याचे होणारे प्रयत्न त्यामुळेच वांझोटे ठरताहेत, असा थेट दावा केल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. अशोक खरात नामक नाशिकस्थित कॅप्टनने अडल्या-नडलेल्या राजकीय पुढारी, उच्चपदस्थ अधिकारी, तरुणी, महिला अशा घटकांसमोर स्वतःची ‘इंफ्लूएन्शल ट्रबल शुटर’ अशी प्रतिमा उभी करत अर्थार्जन, फसवणूक आणि शोषण अशी नकोशी त्रिमिती साधली. सलग दोन दशके अव्याहत सुरु असलेल्या ‘कॅप्टन्स नॉक’चा अलीकडे ‘दि एंड’ झाला. केवळ नाशिकच नव्हे तर अवघ्या मराठी मुलखात ‘कॅप्टन’च्या करामतींनी शिष्यगणांची महाकाय मालिका तयार केल्याचे हळूहळू उजेडात येत आहे.

पाच दिवसांपूर्वी अवघे नाशिक साखरझोपेत असताना पोलिसांनी मध्यरात्री ‘कॅप्टन’च्या राहत्या घरी ‘टकटक’ केली आणि सारा खेळ खल्लास झाल्याचे त्याच्या लक्षात आले. तिशीतल्या एका विवाहितेने अत्याचार केल्याची तक्रार आल्याने पोलिसांनी ‘कॅप्टन’ला ताब्यात घेतले. रामप्रहरी राज्यभर अटकेच्या बातमीचा बभ्रा झाला. गेल्या वर्षापासून घडत असलेल्या घडामोडींवरून हा दिवस केव्हातरी वाटेला येणार याची ‘कॅप्टन’ला जाण असली तरी त्याच्या कृपादृष्टीने स्वतःच्या आयुष्यात आशेचा नवा किरण आणू पाहणाऱ्यांची मात्र अटकेच्या वृत्ताने भीतीने गाळण उडाली. राजकीय ज्योतिषी अशी स्वतंत्र ओळख असलेल्या एवढ्या बड्या हस्तीला बेड्या पडू शकतात, यावर तर प्रथम अनेकांचा विश्वासही बसेना. सर्वच पक्षांतील बिनीच्या नेत्यांशी सलगी असलेल्या ‘कॅप्टन’च्या कारनाम्यांची फाईल दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर पोहचल्यानंतर दोन आठवड्यांनी कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या प्रकरणात काही व्हिडीओ सापडल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातील एक-दोन माध्यमांमध्ये प्रसृतही झालेत. तथापि, ‘कॅप्टन’ रखवाली करीत असलेल्या सिन्नर नजीक देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे नाव झळकल्याने या प्रकरणाला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले. आयतीच संधी चालून आल्याने चाकणकर विरोधक त्यांच्यावर तुटून पडले. ‘कॅप्टन’चे शिष्यत्व कधीतरी अंगलट येवून पदाची आहुती द्यावी लागेल, अशी पुसटशी कल्पना नसलेल्या चाकणकर यांना महिला आयोग अध्यक्षपदावर पाणी सोडावे लागले.

समाजातील विविध घटकांसाठी नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘ओकस प्रॉपर्टी ‘ नामक ‘कॅप्टन’चे कार्यालय म्हणजे अद्भुत किमयेचे ‘पॉवर हाउस’ होते. इथे आल्यावर आयुष्यातील वेदना नाहीशी होवून नवा अध्याय सुरु होईल, अशी भाबडी आशा अनेकांना खुणावत असायची. बड्या घरातील स्त्री-पुरुषांचा राबता इथे दृष्टीस पडत असे. मात्र, आतल्या काळ्या कृत्यांबद्दल सारेच अनभिज्ञ असत. धक्कादायक बाब म्हणजे आतल्या लीलांचे चित्रण खुद्द रखवालदार करत असल्याचे स्पष्ट झाले. श्रद्धा-अंधश्रद्धेच्या बाजारात गोरखधंदा तेजीत असल्याने ‘कॅप्टन’च्या अभ्युदयाचा आलेख द्रुतगतीने उंचावत गेला. अलिशान बंगले, जमीनजुमला, फार्म हाउस, विदेशी गाड्या, सेलेब्रिटीजची वर्दळ अशा ‘उंची’ वातावरणाने ‘कॅप्टन’ची ख्याती सर्वदूर पो होचली. तथापि, महिला लैंगिक शोषण कळीचा मुद्दा ठरत खरात चा ‘खरा’ चेहरा जगासमोर आला. ‘कॅप्टन’विरोधात आतापर्यंत केवळ तीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पुढे आणखी काही प्रकरणांची उकल होऊ शकते. पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या कार्यालयीन सहायकाच्या जबाबात अजून काय बाहेर येते, हेदेखील महत्वाचे ठरणार आहे.

या सगळ्यात ‘कॅप्टन’चा पाय खोलात जावू शकतो. मात्र, अशा प्रकरणांच्या मुळाशी गेल्यावर अगदी उच्चशिक्षित, विज्ञानाधीष्ठीत विचारसरणी असणारे, इतरांना शहाणपणाचे धडे देणारे अवघड, अशक्य इप्सितप्राप्तीसाठी अघोरी कृत्ये करण्यास राजी होतात कसे, ही बाब धक्कादायक आहे. विशिष्ट मर्यादेपर्यंत श्रद्धा राखण्यास भारतीय शास्त्र-संस्कृतीने मोकळीक दिली आहे. मात्र, अंधश्रद्धेच्या आहारी जावून नको ते पदरात पडून घेण्याची लालसा केवळ निंदनीयच नाही तर संबंधितांच्या सामाजिक संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. अघोरी कृत्ये करून अपत्यप्राप्ती होऊ शकते, नोकरीत अपेक्षित पद आणि बढती मिळू शकते वगैरे भ्रामक कल्पना स्वप्नपूर्ती नव्हे तर व्यक्तीला स्वप्नभंग आणि नैराश्याच्या गर्तेत ढकलण्याचे कारण बनतात. शेवटी ‘जनस्मृती लघुकालीन असते’ या शाश्वत सत्याची प्रचीती या प्रकरणानंतरही आल्यास नवल नाही. गैरकृत्यांमुळे लयास गेलेल्या लौकीकानंतर एक ‘कॅप्टन’ सक्तीने निवृत्त केला जाईल, मात्र त्याची जागा अन्य कुणाला देण्यात समाजातीलच अडले-नडलेले तयार न होवोत म्हणजे मिळवली.

सारांशात, पुढच्यास ठेच, मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे दुसऱ्याला आलेल्या विपरीत अनुभवातून शहाणपण शिकणे अपेक्षित असताना समाजात ही संख्या फारच नगण्य आहे. स्वार्थापोटी समाजाला नाडणाऱ्या घटकांना खड्यासारखे बाजूला काढून फेकणे आवश्यक असताना त्यांचा उदोउदो करणारे कमी नाहीत. नकोशा कृत्यापायी तुरुंगाची हवा खावून बाहेर येताच ‘मी त्यातला नाहीच’ अशा आविर्भावात मोकाटपणे वावरत असतात. अशांना समाज बहिष्कृत करण्यासारखे नामी अस्त्रच ठिकाणावर आणू शकते. ‘कॅप्टन’ अथवा तत्सम प्रवृत्तींना असाच धडा शिकवण्यात खरा सामाजिक सुसंकृतपणा अधोरेखित होऊ शकतो, यानिमित्त इतकेच.

Comments are closed.