NGN News
Latest Marathi News

औद्योगिक वातावरण सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी संयुक्त कटिबद्धता

  • कामगार उपायुक्त, निमा व सीटू यांचा सकारात्मक निर्धार

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिक महानगर व जिल्ह्यातील औद्योगिक वातावरण अधिक सौहार्दपूर्ण, स्थिर आणि प्रगतीशील ठेवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा ठाम निर्धार कामगार उपायुक्त विकास माळी, नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) व सीटू यांच्या संयुक्त बैठकीत व्यक्त करण्यात आला.

निमाच्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष आशिष नहार यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच कामगार उपायुक्त कार्यालयास भेट देऊन उपायुक्त विकास माळी यांच्याशी कामगार व उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर सखोल व सकारात्मक चर्चा केली. या चर्चेदरम्यान कामगार कल्याण, उद्योग सुलभता आणि समन्वय वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला.

कामगार उपायुक्त विकास माळी यांनी सांगितले की, कामगारांच्या हितासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले जात असून उद्योजकांच्या अडचणींचाही तत्काळ निपटारा करण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर आहे. तसेच, निमासह जिल्ह्यातील विविध औद्योगिक व सीटूसह अनेक कामगार संघटनांचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

नाशिक सीटूचे अध्यक्ष सीताराम ठोंबरे यांनी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्वरित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी व कामगार उपयुक्त, औद्योगिक व कामगार संघटनांचे पदाधिकारी यांचा समावेश त्यात करावा अशी मागणी केली.

यावेळी निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले की, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यातील नेतृत्वाचे भक्कम पाठबळ मिळत आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये गुंतवणुकीचा वेग वाढण्याची शक्यता असून, यासाठी औद्योगिक वातावरण अधिक सुदृढ व तणावमुक्त ठेवणे आवश्यक आहे.

यावेळी कामगार उपयुक्त विकास माळी सह निमा अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष मनीष रावल, सेक्रेटरी राजेंद्र अहिरे तसेच नाशिक सिटूचे अध्यक्ष सीताराम ठोंबरे, देविदास आडोळे, संतोष काकडे, तुकाराम सोनजे आदी उपस्थित होते.

Comments are closed.