NGN News
Latest Marathi News

अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी; धक्कादायक बाबी उघड

  • कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजेरी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : अवघ्या राज्यभर गाजत असलेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे सांगत कोठडी वाढवण्याची मागणी केली होती.

खरातला कोर्टात आणण्यापूर्वी त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांची तैनाती करण्यात आली होती. सुनावणी पाहण्यासाठी वकिलांचीही मोठी गर्दी झाली होती. सुनावणीदरम्यान SIT अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयात तपासाची माहिती मांडताना अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या. आरोपी महिलांना खडे, पेढे देऊन आणि पाण्यात काही पदार्थ मिसळून देत असे, ज्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत असे आणि त्यानंतर त्यांचे शोषण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला.

तर सरकारी वकिलांनी 6 लाख 53 हजार रोकड, लॅपटॉप मिळाले. काळा रंगाचे रिव्हॉल्व्हर, त्यावर राजमुद्रा आहे. 31 काडतुसे त्यात 5 फायर झाले ते कुठे फायर झाले? नरबळी दिल्याचा संशय आहे. हा 67 वर्षाचा आहे, तो 30 वर्षाच्या मुलीशी लैगिक शोषण करत होता. यावरून त्याची मानसिकता काय लक्षात येते, असे म्हटले. अशोक खरात स्वतःला ‘सिद्ध पुरुष’ सांगत लोकांची फसवणूक करत होता, असा आरोपही करण्यात आला. साप, वाघ यांचा वापर करून भीती निर्माण केली जात होती. तसेच कस्तुरीसारख्या वस्तूंचा वापर करून वन्यजीव कायद्याचे उल्लंघन झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला.

गंभीर बाबींचा तपास अजून बाकी

बचाव पक्षाने मात्र सात दिवसांत पुरेसा तपास झाल्याचा दावा करत पुढील पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगितले. आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असून, पुढील तपास न्यायालयीन कोठडीतही होऊ शकतो, असा युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकिलांनी प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे सांगत पुढील तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. इशान्येश्वर मंदिरातील विधी, आर्थिक व्यवहार आणि इतर गंभीर बाबींचा तपास अजून बाकी असल्याचे त्यांनी नमूद केले. एकूणच, गंभीर आरोप आणि तपासातील नव्या बाबी लक्षात घेता न्यायालयाने अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

साप, वाघ याविषयी खरातचे कानावर हात

पोलीस कोठडी सुनावण्याआधी न्यायाधीशांनी खरातला काही बोलायचं आहे का? असे विचारले. यावर अशोक खरात म्हणाला की, मला साप, वाघ या विषयी काही माहिती नाही. मी हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. मंदिरामध्ये कधीतरी जायचो, त्यावेळी 100 च्या आसपास लोक असायचे. शिवरात्र, श्रावणी सोमवारी अशा वेळी मी जात होतो. 5 दिवसांच्या कोठडीत जे प्रश्न विचारले त्या सर्वांची मी उत्तरे दिली आहेत. मला साप, वाघ याबद्दल काही माहिती नाही, असे त्याने म्हटले.

Comments are closed.