NGN News
Latest Marathi News

राजी-नाराजी नाट्यात महायुतीकडून नरेंद्र दराडेंचा अर्ज दाखल

  • मंत्री, आमदारांची अनुपस्थिती; शिवसेना-भाजपमध्ये नाराजीचा सूर; गोकुळ गीते यांची बंडखोरी; मविआ निवडणुकीतून बाहेर

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रक्रियेंतर्गत महायुतीत नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला जाऊन नरेंद्र दराडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या जागेसाठी जंग जंग पछाडून देखील भाजपच्या हातून ती सुटल्याने पक्षातील इच्छुकांचा हिरमोड झाला. सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी दराडे यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसह शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधी महाविकास आघाडीच्या वतीने मात्र कोणीही अर्ज दाखल केला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक मतदारसंघात महायुतीकडे निर्णायक संख्याबळ असल्याने विजयाची पुरती खात्री लक्षात घेता इच्छुकांची संख्या लक्षणीय होती. या जागेवर भाजप आणि शिवसेना या दोन्ही घटक पक्षांनी दावा ठोकल्याने पेच निर्माण झाला. भाजपकडून गणेश गीते, सुरेश पाटील, निलेश बोरा तर शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, अंजुम कांदे, भाऊसाहेब चौधरी आणि अजय बोरस्ते हे इच्छुक होते. त्यातच गणेश गीते यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज भरल्याने महायुतीत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, रविवारी रात्री जागावाटप जाहीर होऊन शिवसेनेने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी बहाल केली.

महायुतीतील इच्छुक नाराज

दरम्यान, याआधी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत नरेंद्र दराडे हे एकसंध शिवसेनेचे उमेदवार होते. त्यांच्यापुढे राष्ट्रवादी कॉंग्रेस-भाजप आघाडीचे शिवाजी सहाणे यांनी आव्हान उभे केले होते. मात्र, दराडे यांनी एकहाती विजयाची नोंद केली होती. दराडे यांना पुन्हा उमेदवारी न देता नवा चेहरा देण्यात यावा, असा सूर पक्षात होता. मात्र, पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी दराडे यांच्या पारड्यात वजन टाकले. यामुळे शिवसेनेतील इतर इच्छुक तसेच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाजपमधील इच्छुकांचा हिरमोड झाला.

तीन मंत्री, अकरा आमदार अनुपस्थित

नाशिक जिल्ह्यात महायुतीचे प्राबल्य आहे. जिल्ह्यात छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ आणि दादाजी भुसे हे मंत्री आहेत. शिवाय, गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचे प्रभारीपद आहे. असे असताना भुसे वगळता इतर तीन मंत्री दराडे यांचा अर्ज भरतेवेळी अनुपस्थित होते. शिवाय, सीमा हिरे आणि राहुल ढिकले हे आमदार वगळता सुहास कांदे, डॉ. राहुल आहेर, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, दिलीप बोरसे, नितीन पवार, सरोज आहिरे, देवयानी फरांदे हे महायुतीचे आमदार उपस्थित नसल्याने त्याची मोठी चर्चा झाली.

गीते, बोडके अपक्ष मैदानात

दरम्यान, भाजपमधील एक इच्छुक गणेश गीते यांनी शनिवारी अर्ज भरला असताना ही जागा शिवसेनेला सुटल्याने त्यांची दावेदारी संपुष्टात आली. तथापि, त्यांचे लहान बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीत ट्वीस्ट निर्माण केला. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी गोरख बोडके यांनीही अपक्ष अर्ज भरल्याने महायुतीमधील बेबनाव उघड झाला.

मविआची माघार

महाविकास आघाडीमध्ये नाशिकची जागा शिवसेना उबाठा पक्षाला सुटली होती. निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, कदम यांनी अर्ज दाखल न करता निवडणुकीतून माघार घेण्याची भूमिका घेतली. मतदारांचे संख्याबळ जुळत नसल्याने शिवसेना उबाठाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

Comments are closed.