
- शिवसेना उबाठा पक्ष मैदानात उतरण्याची शक्यता गडद
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक लढवून जिंकण्यासाठी महायुतीत अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याची अवस्था असताना दुसरीकडे तोकड्या संख्याबळामुळे विरोधी महाविकास आघाडीत तितकासा उत्साह नसल्याचे जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी सर्व ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केल्याने नाशिकमध्ये शिवसेना उबाठा पक्ष महायुतीसमोर असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसे झाल्यास नेमका कोणता मोहरा महायुतीला टक्कर देण्यास पुढे आणला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नाशिक मतदारसंघात नवा विधान परिषद सदस्य निवडीसाठी एकूण ६१८ मतदार आहेत. यापैकी तब्बल ४६६ हून अधिक मतदार सत्ताधारी महायुतीकडे आहेत. स्वाभाविकच महायुतीकडे उमेदवारीसाठी अक्षरशः रस्सीखेच सुरु आहे. केवळ उमेदवार भाजप की शिवसेनेचा एव्हढीच औपचारिकता बाकी आहे. महाविकास आघाडीचा विचार करता सर्वाधिक मते शिवसेना उबाठा पक्षाकडे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार आणि कॉंग्रेस या पक्षांकडे मतदारांची संख्या अतिशय कमी आहे. स्वाभाविकच, नाशिकच्या जागेवर शिवसेना उबाठा पक्षाचा उमेदवार असण्याची शक्यता गडद झाली आहे. मविआला मालेगाव महापालिकेत सत्तेत असलेल्या इस्लाम पार्टी आणि जनता दल या पक्षांचे पाठबळ मिळणे निश्चित आहे. ती बाब लक्षात घेता विरोधकांचे संख्याबळ १५४ पर्यंत जाणार आहे.
विरोधकांसाठी केवळ औपचारिकता
या निवडणुकीतील संख्याबळाचा विचार करता महायुती आणि मविआ यांच्यातील मतांमध्ये मोठी तफावत आहे. एरव्ही ‘मनी’ आणि ‘मसल’ पॉवर निर्णायक ठरणाऱ्या या निवडणुकीत म्हणूनच उमेदवारी घ्यायला देखील विरोधकांकडून कोणी धजावत नसल्याचेहि स्पष्ट झाले आहे. केवळ औपचारिकता आणि निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून मविआ उमेदवार मैदानात असण्याची शक्यता आहे.
@ नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी कोणत्याही परिस्थितीत लढणार आहे. संख्याबळाचा विचार करता माविआत शिवसेना उबाठा पक्षाचा उमेदवार दिला जाईल. महायुतीकडे मोठे बहुमत असले तरी निवडणूक बिनविरोध होऊ न देता ती लढायची ह्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.
- कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार)
Comments are closed.