NGN News
Latest Marathi News

नाशिक वसंत व्याख्यानमालेचा ज्ञानयज्ञ येत्या शुक्रवारपासून

  • दिग्गज वक्त्त्यांची विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण व्याख्याने श्रोत्यांना रिझवणार

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : शतकोत्तर परंपरा असलेल्या नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेचा ज्ञानयज्ञ येत्या शुक्रवार (दि. १ मे)पासून सुरू होत आहे. सकस, सक्षम आणि तेवढेच सुदृढ विचार पेरण्याच्या या परंपरेचे यंदाचे १०३ वे वर्ष असून, या ज्ञानयज्ञात उद्घाटकीय वक्ते म्हणून आयोध्या येथील श्री राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष संत गोविंददेव गिरी हे ‘कथा तथागतची : संदेश… समतेचा, करुणेचा, प्रज्ञेचा ! अर्थात् भगवान गौतम बुद्ध’ या विषयावर सलग तीन दिवस व्याख्यान देणार आहेत.

दरम्यान, संत गोविंददेव यांच्याबरोबरच येत्या रविवारी (दि. ३) सायंकाळी 6.00 वाजता प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ब्रह्मकुमारी शिवानी दीदी यांचे ‘अनिश्चित समय में आंतरिक शक्ति’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. याशिवाय डॉ. अभय बंग, डॉ. मारुती पवार, प्रा. समीर मीत्रगोत्री, सरिता कौशिक, डॉ. गजानन घोडके, डॉ. नितीन वाघमोडे, भूषण गरवारे, विजय तळले व रवींद्रसिंघ मोदी या दिग्गज वक्त्त्यांची विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने यंदाचे विशेष आकर्षण असणार आहेत. येथील सह्याद्री फार्म्स हे व्याख्यानमालेचे प्रायोजक आहेत.

वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, कार्याध्यक्ष संगीता बाफणा, सरचिटणीस हेमंत देवरे, खजिनदार अविनाश वाळुंजे व पदाधिकारी, कार्यकारी मंडळातर्फे ही माहिती देण्यात आली. गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणावर रोज सायंकाळी ७.१५ वाजता व्याख्यानमाला सुरू होईल. यामध्ये जगभरातील तज्ज्ञ मान्यवरांचे रोज विविध विषयांवरील व्याख्यानांची मेजवानी नाशिककरांबरोबरच ऑनलाईनच्या माध्यमातून संपूर्ण जगभरातील रसिकांना मिळणार आहे. त्याचबरोबर रोज सायंकाळी व्याख्यानानंतर सुश्राव्य हिंदी-मराठी गितांचा सांस्कृतीक कार्यक्रम तसेच, रोज नवीन चित्रकारांच्या चित्रप्रदर्शनाचाही लाभ नाशिककरांना घेता येणार आहे. शुक्रवार (दि. १)पासून सुरू होणारी व्याख्यानमाला संपूर्ण मे महिनाभर सुरू राहणार असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

यंदाच्या व्याख्यानमालेत सुरूवातीची दोन विचारपुष्पे संत गोविंददेव गिरी हे गुंफणार असून, तिसरे पुष्प शिवानीदीदी व संत गोविंददेव गिरी हे गुंफणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते व्याख्यानमालेचा शुभारंभ होईल. या वेळी उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, विरोधी पक्षनेते प्रथमेश गिते प्रमुख पाहुणे असतील.

Comments are closed.