
- भाजपसह स्थानिक रहिवाशांचा विरोध; बिल्डरकडून मात्र इन्कार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक: शहरातील अत्यंत गजबजलेल्या उंटवाडी परिसरातील ‘सेंट्रल पार्क’ या उच्चभ्रू निवासी प्रकल्पात विशिष्ट धर्मीय विद्यार्थ्यांसाठी निवासी वस्तीगृह (होस्टेल) सुरू करण्याचा घाट घातल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रकल्पातील काही सदनिका नागपूरस्थित एका होस्टेल व्यवस्थापन कंपनीला करारावर देण्यात आल्याच्या वृत्तानंतर रहिवाश्यांनी त्यास आक्षेप घेतला. मात्र, प्रकल्प संचालकांनी असा कोणताही करार झाला असल्याचा इन्कार करीत त्याबाबत प्रसृत झालेला मजकूर तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, भाविक ग्रुपने उंटवाडी रोडवरील ‘सेंट्रल पार्क’ या भव्य प्रकल्पातील अनेक फ्लॅट्स गुपचूप नागपूरच्या एका होस्टेल व्यवस्थापन कंपनीला करारावर दिल्याची वार्ता शहरात पसरली. हे सर्व फ्लॅट्स केवळ विशिष्ट धर्मातील विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी वापरले जाणार होते. शहराच्या मध्यवस्तीत असा प्रकार सुरू झाल्याने परिसरातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात येण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली. स्थानिक रहिवाशांना याचा सुगावा लागला असता त्यांनी त्यावर आक्षेप नोंदवल्याचे सांगण्यात येते.
भाजप नगरसेवक घटनास्थळी
या संतापजनक प्रकाराची माहिती मिळताच भाजप नगरसेवक सुधाकर बडगुजर हे कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांना सोबत घेत घटनास्थळी दाखल झाले. निवासी प्रकल्पात व्यावसायिक होस्टेल कसे काय आणि सामन्यांच्या इमारतीत वस्तीगृह का, असे थेट सवाल करत आंदोलकांनी सेंट्रल पार्क परिसर दणाणून सोडला.
‘तो’ मजकूर दिशाभूल करणारा..
सेन्ट्रल पार्क हा निवासी प्रकल्प आणि येथील सदनिकाधारक माझ्यासाठी नेहमीच कुटुंबाप्रमाणे राहिले आहेत. येथील शांतता आणि सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी आम्ही सदोदित कटिबद्ध आहोत. समाज माध्यमांवर या प्रकल्पासंदर्भात प्रसिध्द झालेला मजकूर निखालस खोटा आणि तथ्यहीन आहे. चर्चेत असलेल्या सर्व गोष्टी पूर्णपणे निराधार आहेत. आम्ही कोणत्याही कंपनीशी कोणताही करार किंवा व्यवहार केलेला नाही. आजपर्यंत आम्ही फक्त स्वतंत्र (सिंगल) इन्व्हेंटरीच विक्रीसाठी ठेवलेली आहे. आम्ही पुढेही या प्रकल्पातील प्रत्येक रहिवाशाला माझ्या कुटुंबाचा भाग मानून त्यांची सुरक्षितता आणि कल्याण यांना प्राधान्य देत सर्व निर्णय पारदर्शी आणि योग्य पद्धतीने घेण्याची ग्वाही देतो.
– पिंकेश शहा
(बांधकाम व्यवसायिक)
Comments are closed.