
- मान्यवरांसह साहित्यप्रेमींची उपस्थिती; पाटील यांना पुढील साहित्य प्रवासासाठी शुभेच्छा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : नवोदित लेखिका मृणाल पाटील यांच्या ‘तिचं मन तिचं आकाश’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि. २५) गोविंदनगर येथील ऋग्वेद हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाले. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून अॅड. प्रेरणा देशपांडे, माजी आमदार निर्मलाताई गावित, निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे, ज्येष्ठ संपादक मिलिंद सजगुरे, प्रकाश गोवर्धने, नितीन भुजबळ, उपमुख्याध्यापक राजेश भुसारे, राजश्रीताई पाटील, मनीषा पाटील, सागर आहेर, आण्णा पाटील-बोरगुडे आदी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “तरुण पिढीने लेखनासारख्या सृजनशील क्षेत्राकडे वळणे ही समाजासाठी सकारात्मक बाब असून, मृणाल पाटील यांचे हे पहिलेच पुस्तक असूनही त्यांनी संवेदनशील विषय हाताळण्याचे धाडस दाखवले आहे. त्यांच्या पुढील साहित्य प्रवासासाठी शुभेच्छा.”
ज्येष्ठ संपादक मिलिंद सजगुरे म्हणाले, “लेखन हे केवळ शब्दांचे नसून ते अनुभव आणि जाणिवांचे प्रतिबिंब असते. ‘तिचं मन तिचं आकाश’ या पुस्तकातून स्त्रीमनाचे सूक्ष्म भावविश्व प्रभावीपणे समोर येते. अशा लेखनातून समाजाला विचार करायला भाग पाडणारी ताकद निर्माण होते.”
याप्रसंगी मान्यवरांनी मृणाल पाटील यांच्या लेखनाचे कौतुक करत पुढील साहित्य प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ शिक्षिका कीर्ती कदम यांनी पुस्तकाचे परीक्षण व समीक्षण करताना पुस्तकातील स्त्रीमनाच्या भावना आणि वास्तव जीवनातील अनुभवांची प्रभावी मांडणी अधोरेखित केली. पुस्तकामधून स्त्रीमनाच्या विविध छटा, भावविश्व आणि आयुष्याचा प्रवास संवेदनशील शब्दांत मांडण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनीता काकूळते यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन सुयोग्य रितीने पार पडल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
Comments are closed.