NGN News
Latest Marathi News

वेरुळला जपानुष्ठान सोहळ्याची सांगता ; हजारो भाविकांची उपस्थिती

  • जगदगुरु शांतीगिरीजी महाराजांनी भाविकांना केले मार्गदर्शन

नाशिक : अमर आढाव
वेरुळ येथील निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज आश्रमात अक्षयतृतीया निमित्त आठवडाभर आयोजित करण्यात आलेल्या जपानुष्ठान सोहळ्याची सांगता पालखी मिरवणुकीनंतर करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर,संत व भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. “जय बाबाजी” अशा जयघोषाने हजारो साधकांच्या मौनव्रताची सांगताही यावेळी करण्यात आली.

कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज धर्मपीठाचे पिठाधीश्वर अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या पावन उपस्थितीत, अक्षयतृतीया निमित्त वेरूळ येथे ‘ॐ जगदगुरु जनशांती धर्म सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.आठवड्या भरापासून सुरू असलेल्या या सोहळ्या प्रसंगी जपानुष्ठान,महायज्ञ,महिला जप,अखंड नंदादीप, हस्त लिखित नामजप,प्रवचन, भजन, सत्संग पालखी सोहळे यांसह विविध भरगच्च उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सांगता सोहळ्यास आश्रमीय संत, विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सांगता सोहळ्याच्या प्रारंभी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या पवित्र पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण वेरूळ नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. पालखी सोहळ्यात महिला, युवक, तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या सोहळ्यात राज्यभरातील विविध भागातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यानंतर आयोजित सत्संग सोहळ्या प्रसंगी पालखी पूजन, पाद्य पूजन,संत,ब्राम्हण,अतिथी पूजन याबरोबरच फळावर,दुधावर, पाण्यावर आणि खास करून हवेवर आठवडाभर साधना करणाऱ्या भाविकांचा विशेष सन्मान करण्यात आला. जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी उपस्थित हजारो भाविकांना मार्गदर्शन केले.गोमातेचे रक्षण करा,भारतीय सांस्कृतीचा स्वीकार करा, महिलांनी पतीला परमेश्वर मानून सेवा करावी,सासूने सुनेला मुलगी मानावे, सुनाने सासूला सख्खी आई मानावे.सर्वांचा आदर करावा,सतत भगवंताचे व गुरूंचे नामस्मरण करावे हे सुखी संसाराचे रहस्य त्यांनी सांगितले. सदपुरुषांच्या चित्राचे व खास करून त्यांच्या चरित्राचे पूजन करावे असेही यावेळी जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज म्हणाले.

जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने आगामी काळात अधिक मास निमित्त १७ ते १९ मे दरम्यान रत्नागिरी येथे महायज्ञ, अखंड नंदादीप सोहळा होणार आहे. २१ ते २८ मे रोजी मध्यप्रदेश येथील खालघाट मध्ये जपानुष्ठान सोहळा संपन्न होणार आहे.३० जून ते ७ जुलै दरम्यान अयोध्या येथे वार्षिक तीर्थयात्रा अंतर्गत जपानुष्ठान सोहळा होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.भक्त परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमांच्या सांगते नंतर उपस्थित भाविकांना दिवसभर महाप्रसाद वाटप करण्यात आला.

Comments are closed.