
- आस्थापनांत कार्यसंस्कृती निर्माणावर बैठकीत मतैक्य
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : बहुचर्चित टीसीएस कंपनीतील महिला लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या घटनेने नाशिक हादरल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आयटी असोसिएशन अर्थात ‘निटा’ ने महिला सुरक्षेसाठी नियमावली जाहीर केली आहे. यामुळे शहरात आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या हजारो कर्मचारी आणि विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच मिळणार आहे.
‘निटा’ च्या मंगळवारी झालेल्या बैठकीत टीसीएस कंपनीतील महिला लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या घटनेचा निषेध करण्यात आला. आयटी क्षेत्रात वाढलेली स्पर्धा समजण्याजोगी असली तरी महिला सुरक्षा आणि संस्कृती, शिष्टाचार, व्यावसायिक मुल्ये यांबाबत सजगता बाळगण्याविषयी एकमत झाले. बैठकीला ‘निटा’ चे अध्यक्ष अमर ठाकरे, माजी अध्यक्ष मकरंद सावरकर, भाजप सुशासन ( गुड गव्हर्नंस ) आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, नेटविन सोलुशन्सचे अरविंद महापात्रा आदींनी मार्गदर्शन केले. नाशिक जिल्ह्यात सध्या सुमारे २५० आयटी कंपन्या कार्यरत असून त्यामध्ये सुमारे १५ ते १८ हजार कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती यावेळी ठाकरे यांनी दिली. महिला कर्मचाऱ्यांचे त्यामधील प्रमाण अंदाजे ४० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचेही ते म्हणाले. टीसीएस कंपनीतील प्रकरणाची पुनरावृत्ती होवू नये, यासाठी भविष्यात धोरण ठरवणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
बैठकीत कर्मचारी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, ‘पॉश’ नियमांची कठोर अंमलबजावणी, विशाखा समितीच्या सक्रियतेची अनिवार्यता आणि व्यावसायिक मूल्यवृद्धी या चतु:सुत्रीचे पालन करणे कंपन्यांना बंधनकारक करण्याच्या धोरणावरही बैठकीत मतैक्य झाले. कार्यरत असलेल्या ठिकाणी सुरक्षा आणि सन्मान असणे, वैयक्तिक मर्यादा, व्यवस्थापन सजगता यांबाबत जागृती होणे गरजेचे असून महाविद्यालयांत विद्यार्थिनीसाठी जनजागृती उपक्रम राबवण्याचा निर्णयही बैठकीत झाला. आस्थापनांत कार्यसंस्कृती निर्माण हेतूने पुरुष कर्मचाऱ्यांना संवेदनशीलता प्रशिक्षण देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. बैठकीला सुमारे दोनशे कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
@ महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना आणि जनजागृती ही काळाची गरज आहे. कंपन्यांमध्ये काम करताना महिला कर्मचारी असुरक्षित असणे भारतीय संस्कृती मूल्यांना छेद देणारी बाब आहे. किंबहुना, प्रत्येक कंपन्यांनी महिला सुरक्षेला अनुसरून योग्य व्यवस्था करणे गरजेचे आहे. नाशिकमध्ये झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही, याची व्यापक काळजी घेणे गरजेचे आहे. हे क्षेत्र सुरक्षित ठेवण्यास आम्ही कटिबद्ध राहू.
- प्रदीप पेशकार, अध्यक्ष, भाजप सुशासन ( गुड गव्हर्नंस ) आघाडी
Comments are closed.