
- नवीन नाशिक परिसरात नगरसेवकासह जमीन मालकाकडून नियम धाब्यावर
- विधान परिषदेत ‘लक्षवेधी’द्वारे मुद्दा उपस्थित; महापालिका आयुक्तांना चौकशीचे आदेश
नाशिक : क्रीडा आणि सामाजिक सुविधांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर अनधिकृत मंगल कार्यालय थाटल्याचा गंभीर प्रकार शहरात उघडकीस आला आहे. नवीन नाशिक परिसरात सुमारे सहा हजार चौरस मीटर क्षेत्रावरील हे कार्यालय उभारताना एका राजकीय पक्षाच्या नगरसेवकासह जमीन मालकाने नियम धाब्यावर बसवले. यासंदर्भात विधान परिषदेत ‘लक्षवेधी’द्वारे मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
शिवसेना आ. अनिल परब यांनी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. नवीन नाशिक परिसरात नेबरहूड सेक्टर येथे प्लॉट क्रमांक २९ हा सुमारे ६२६९.४८ चौरस मीटर क्षेत्राचा भूखंड क्रीडा आणि सामाजिक सुविधांसाठी राखीव आहे. तथापि, एका नगरसेवकासह जमीन मालकाने त्या जागेवर अलिशान अनधिकृत मंगल कार्यालय थाटले. यासंदर्भात महापालिकेच्या कोणत्याही परवानग्या घेण्यात न आल्याची धक्कादायक माहिती आ. परब यांनी सभागृहाला दिली. संबंधित भूखंडाचा ना नकाशा ना भोगवटा प्रमाणपत्र अशी स्थिती असताना संबंधितानी अनधिकृत कार्यालय उभारून आर्थिक लाभ उचलण्याचा सपाटा सुरु ठेवला आहे. सदर प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची, भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची तसेच संबंधित व्यक्तींविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही आ. परब यांनी सभागृहात केली.
दरम्यान, या लक्षवेधीची दखल घेत नगरविकास विभागाने महापालिका प्रशासनाला गेल्या १३ एप्रिल रोजी पत्र पाठवून सविस्तर अहवालाची मागणी केली आहे. यासंदर्भात नाशिक महापालिका प्रशासन काय पावले उचलते, याकडे नाशिककरांचे लक्ष लागून राहणार आहे.
Comments are closed.