
- दोन लाखांना नाडल्या गेलेल्या महिलेची गुरुवारी मध्यरात्री पोलिसांत तक्रार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : विविध कारणांनी सुमारे शंभरहून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केलेल्या कथित माध्यमकर्मी रवींद्र एरंडे याने नोकरी लावून देण्याच्या नावाखाली नऊ जणांना १३.८० लाखांचा चुना लावल्याचेही उघड झाले आहे. अशाच फसवणूक प्रकारात नाडल्या गेलेल्या एका महिलेने गुरुवारी मध्यरात्री सातपूर पोलीस ठाण्यात एरंडे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, एरंडे याने संबंधित महिलेला आदिवासी विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपयांची मागणी केली. याआधी आपण राजेंद्र सबनीस नामक व्यक्तीला याच विभागात नोकरी लावून दिल्याचा बनवाही एरंडे याने केला. महिलेने एरंडे यास दोन लाख रुपये दिले. अनेक दिवस प्रतीक्षा करूनही संबंधित महिलेला नोकरी लागली नाही. अलीकडे जेव्हा एरंडे याचे लैंगिक शोषण प्रकरण बाहेर आले, तेव्हा दूरचित्रवाणीवरील एका वृत्तात एरंडे याचे छायाचित्र पाहिल्यावर महिलेला याच व्यक्तीने आपली आर्थिक फसवणूक केल्याची खात्री झाली. तिने तडक धाव घेत सातपूर पोलीस ठाण्यात एरंडे विरोधात गुन्हा दाखल केला. इतर आठ जणांनी देखील एरंडे याच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, एरंडे याने नोकरी लावून देण्याच्या नावाखाली नऊ जणांना १३.८० लाखांना फसवले आहे.
बनावट नियुक्तीपत्रे आढळली
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी रवींद्र एरंडे याच्या घरी झाडाझडती केली असता त्यांना तीन बनावट नियुक्तीपत्रे आढळून आली. एरंडे याने फिर्यादीकडून नोकरी लावून देण्याच्या नावाखाली ठरलेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम घेतल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. नोकरीचे आमिष दाखवलेल्या व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने पोलीस त्या दिशेने चौकशी करीत आहेत.
Comments are closed.