NGN News
Latest Marathi News

अमेरिकेहून परतलेल्या उच्चशिक्षित विद्यार्थ्यावर काळाची झडप

  • कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; २४ वर्षीय शंतनू बुऱ्हाडे मृत्युमुखी; दोघे गंभीर जखमी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : शिक्षण पूर्ण करून अमेरिकेहून परतलेल्या २४ वर्षीय विद्यार्थ्यावर काळाने झडप घातल्याची दुर्दैवी घटना शहरात घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शंतनू जयंत बुऱ्हाडे ( रा. दीपज्योती, धनराजनगर, जेलरोड) असे मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो स्वतः चालवत असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होवून त्याचा जागीच मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, अमेरिकेहून उच्च शिक्षण घेवून आलेला शंतनू शनिवारी दुपारच्या सुमारास आपल्या कारने दोन मित्रांसह गंगापूर धरण परिसर फिरण्यासाठी गेला होता. नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेऊन रात्री साडेआठच्या सुमारास गिरणारेकडून नाशिककडे परतत असताना गोदावरीच्या पुलाजवळ असलेल्या ‘गंमतजमंत’ हॉटेललगत शंतनूचे कारवरील नियंत्रण सुटले. कारचा वेग जास्त असल्याने ती रस्त्यावर अनेकदा उलटली आणि शेवटी कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातात शंतनूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. 

शंतनूचे दोन मित्रही गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांच्या वतीने देण्यात आली. शंतनूचे वडील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये कार्यरत असून तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्युनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments are closed.