
- शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणात मिसेस खरात एसआयटीच्या रडारवर
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शिर्डीत जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातसह त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अनुषंगाने खरातची पत्नी कल्पना ह्या एसआयटीच्या रडारवर आल्या आहेत. मंगळवारी रात्री एसआयटी पथकासह पोलिसांनी खरातच्या नाशिकमधील निवासस्थानी धडक दिली असता कल्पना खरात फरार असल्याचे सिद्ध झाले. यावेळी खरातचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले.
गेल्या अनेक दिवसांपासून खरात ताब्यात असूनही तो तपासात सहकार्य करत नसल्याने त्याच्या समोर मुलाची चौकशी होणार आहे. अशोक खरात सहकार्य करत नाही, स्पष्ट माहिती देत नसल्यानं तपास पुढे सरकत नसल्याची माहिती समोर येत आहे. अशोक खरातकडून अधिकाधिक माहिती गोळा करून त्याच्या पत्नीला अटक करण्याचे एसआयटीचे लक्ष आहे. प्रारंभी लैंगिक शोषणाचा गुन्ह्याचा तपास करण्यावर एसआयटीचा भर असून त्यानंतर इतर गुन्ह्याचा तपास केला जाणार आहे. याच कारणाने एसआयटीकडून अशोक खरातचा सीए, ईशान्यश्वर मंदिराचा पुजारी आणि एक सराफ व्यावसायिकाची कसून चौकशी करण्यात आली.
शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदीप्रकरणी अशोक खरातसह 5 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत शिर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
अटकेची कुणकुण आणि पत्नी फरार..
दरम्यान, खरातची पत्नी कल्पना खरात यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्या फरार झाल्याची माहिती असून पोलिसही त्यांच्या मागावर आहेत. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस कारवाई करणार आणि अटक करणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर कल्पना खरात फरार झाल्याची माहिती आहे. अटकेसाठी दोन पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची सूत्रांनी माहिती दिली.
Comments are closed.