
- पाच विकासक, महापालिकेच्या माजी स्थायी समिती सभापतीचा समावेश
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील नामांकित विकासकांसह अनेकांचा समावेश असलेल्या बहुचर्चित म्हाडा फसवणूक घोटाळ्यात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलेल्या सहा जणांना न्यायालयाने दणका दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेणाऱ्या सहाही जणांचा अर्ज शुक्रवारी फेटाळण्यात आला. त्यामध्ये पाच विकासक आणि नाशिक महापालिकेच्या एका माजी स्थायी समिती सभापतीचा समावेश आहे. उर्वरित संशयीतांनाही हाच न्याय मिळण्याची शक्यता असल्याने या घोटाळ्यात सहभागी सर्वांचेच धाबे दणाणले आहे.
प्राप्त माहितीनुसार, ज्यांचे जामीन अर्ज फेटाळले गेले त्यामध्ये विक्रम कपाडिया, आशा बनकर, गणेश गिते, अभिषेक ठक्कर, राहुल लुणावत आणि सचिन वाघमारे यांचा समावेश आहे. या प्रकरणातील एक संशयित दिनेश उर्फ सोनू कन्हैय्यालाल मनमानी याला आधीच अटक झाली आहे. बनावट कागदपत्रे आणि नकाशांच्या आधारे गृहनिर्माण प्रकल्प साकारल्या प्रकरणी विकासक, जागा मालक आणि इतर अशा १९८ जणांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एकूण ४९ प्रकल्पांत या मंडळींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आटत सहा जणांचे जामीन अर्ज फेटाळले गेल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांच्यापुढे उच्च न्यायालयात धाव घेण्याचा पर्याय असल्याने हे सर्व नेमके कोणते पाऊल उचलतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहणार आहे.
Comments are closed.