
- राजकारण्यांचा काळा पैसा जमा करुन व्याजाने देण्याचा गोरखधंदा उघड
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्याभोवती एसआयटीसह चौकशी यंत्रणांचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहारात गुंतलेल्या व्यक्तींचा छडा लावण्यासाठी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. याअंतर्गत खरातच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
एसआयटीच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबींची उकल होत असताना खरात याने हवाला रॅकेट आणि व्याजाच्या धंद्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याचे स्पष्ट झाले आहे. खरात हा त्याच्या संपर्कातील वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक, उद्योजक आणि राजकारण्यांचा काळा पैसा जमा करुन तो व्याजाने द्यायचा, अशी शक्यता आहे. याशिवाय, तो हवालामार्फत देश-विदेशात तो शेकडो कोटींची हेराफेरी करत आल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातच्या या आर्थिक गैरव्यवहाराच्या रॅकेटची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या सगळ्याची चौकशी ई़डीकडून होण्याची शक्यता आहे. अशोक खरात याच्या आर्थिक व्यवहारांचा अहवाल ईडीकडे जाणार आहे. यानंतर ईडी या तपासाची सूत्रे हाती घेऊ शकते.
केबिनला काळ्या रंगाची काच
दरम्यान, खरात याच्यावर आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी 8 गुन्हे हे लैंगिक अत्याचाराचे तर दोन फसवणुकीचे आहेत. त्यादृष्टीने एसआयटी पथकाकडून अशोक खरात याच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. खरातच्या कॅनडा कॉर्नर येथे असणाऱ्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची सलग तिसऱ्या दिवशी कसून तपासणी करण्यात आली. खरात याने बाहेरुन केबिनच्या आतले दृश्य दिसू नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली होती. त्यामुळेच तो केबिनच्या बाहेर लोकांची गर्दी असतानाही आतमध्ये महिलांवर बिनधास्तपणे लैंगिक अत्याचार करायचा. अशोक खरातच्या केबिनसह कार्यालयाची प्रत्येक काच अतिगडद काळ्या रंगाची आहे. या काचा अत्यंत उच्च दर्जाच्या आहेत. काचांचा दर्जा पाहून थोड्यावेळासाठी तपास पथकही थक्क झाले.
Comments are closed.