NGN News
Latest Marathi News

कुठे हरवला ‘व्हिसल ब्लोअर्स’ चा रव ? ( सारीपाट/मिलिंद सजगुरे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क

  महिलांचे लैंगिक शोषण,अंधश्रद्धेचा मांडलेला बाजार, अडल्या-नाडलेल्यांची फलप्राप्तीच्या नावाखालील घोर आर्थिक फसवणूक आणि या साऱ्या जुमलेबाजीतून साधलेला अभ्युदय या चतु:ष्कोनातून बहुचर्चित कॅप्टन अशोक खरात याने नाशिकला नकोशा चर्चेत आणले. खरातच्या जुमलेबाज परिघात दिग्गज राजकारणी, उच्चपदस्थ अधिकारी, उद्योजक, सुखाच्या शोधातील असंख्य जिवंत आत्मे आदींचा समावेश असल्याचे सकृतदर्शनी जाणवत असले तरी ही सूची त्यापेक्षा मोठी असण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. आजवर जे प्रयोग भोंदूबाबा अथवा कथित बुवाबाजीत कानावरही पडले नसावेत, त्या सर्वांची एकत्रित अनुभूती ‘कॅप्टन’च्या करामतींमध्ये प्रत्ययास आली. गेल्या दहा दिवसांत या कोलाहलाची वंदता अवघ्या मराठी मुलखात झाली असताना स्थानिकांचे यासंदर्भातील मौन केवळ आश्चर्यकारकच नव्हे तर अनाकलनीय वाटते. स्थानिकांची सामाजिक संवेदनशीलता इतकी बोथट झालीय का, की एवढ्या मोठ्या घटनेवर साधे शाब्दिक निषेधाचे रव देखील कानी पडू नयेत ?

   गेल्या तब्बल दोन दशकांपासून अंकशास्त्र आणि कथित ब्रम्हांडविद्या अवगत असल्याची हाकाटी पिटून त्यावर स्वलौकिक आणि स्वार्थाची पोळी भाजणाऱ्या कॅप्टन अशोक खरातच्या लीलांनी अवघा उभा महाराष्ट्र ढवळून निघाला. कॅप्टनच्या सर्वपक्षीय आणि विशेषतः सत्ताधाऱ्यांशी असलेल्या लागेबांध्यांची सबलता लक्षात घेता त्याच्याविरुध्द थेट अटकेची कारवाई करणे तेव्हढे सोपे नव्हते. तथापि. यासंदर्भात दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी सूत्रे हलवल्याने नाशिक पोलिसांनी ते सोपस्कार पूर्ण केले. ‘एसआयटी’ चौकशीत कॅप्टनच्या नाना भानगडींची उकल होत आहे. या प्रकरणात नाशिकच्या बदनामीचे कारण बनलेल्या या कॅप्टनच्या काळ्या करामतींविरोधात अवघी प्रसारमाध्यमे आणि निवडक राजकीय पक्षांचे निवडक चेहरे तुटून पडत असताना एरव्ही लहान-सान घटनांना ‘इव्हेंट’चे स्वरूप देणाऱ्या स्थानिक ‘व्हिसल ब्लोअर्स’ चा रव मात्र कानी पडताना जाणवत नाही. ही शांतता केवळ अनाकलनीय आणि अतर्क्यच नाही तर संवेदनशीलता हरपल्याचे ते स्पष्ट द्योतक आहे.

  राज्य अथवा राष्ट्रीय स्तरावर एखादी समाज प्रतिमेला डंख मारणारी घटना घडली तर तीविरोधात ऐक्याची वज्रमूठ आवळण्यात पुढे येणाऱ्यांची नाशिकमध्ये वानवा नाही. आम्ही अमुक एका घटनेचा निषेध करतोय किंवा केला, हे दाखवण्यासाठी समाज माध्यमांपासून ते मुद्रित-इलेक्ट्रोनिक माध्यमांपर्यंतच्या व्यवस्थापनात पारंगत असलेल्या व्यक्ती वा संस्था एवढ्या मोठ्या घटनेचा साधा शाब्दिक निषेध देखील करत नाहीत, हे अचंबित करण्याजोगे नाही का ? सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, अराजकीय संघटना अशा सर्वांनी खरात अध्यायावर न बोलण्याची अव्यक्त भूमिकाच घेतली आहे की काय, अशी शंका येते. मूळ पुण्याच्या सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारी यांनी प्रत्यक्ष नाशकात येवून पोलीस आयुक्तांना भेटणे किंवा अंजली दमानिया यांनी मुंबईत माध्यम संवादाद्वारे याप्रकरणी संवेदना प्रकट करण्याची हिकमत दाखवली, हे कौतुकास्पद आहे. नाशिक शहरात महापौरांसह तीन महिला आमदार, एक महिला खासदार वास्तव्यास आहेत. किमान महिला लैंगिक शोषण मुद्द्याविरोधात त्यांनी रान पेटवणे अपेक्षित होते. पण निषेधाचा एक शब्ददेखील त्यांनी काढू नये, हे अनाकलनीय आहे. विधिमंडळातील चर्चेतही तशी धार जाणवली नाही. इतर लोकप्रतिनिधींनीही त्याबाबत अवाक्षर न काढण्याची जणू शपथ घेतली का,असेच एकूण चित्र दिसत आहे.

  नाशिक शहराची पार्श्वभूमी धार्मिक स्वरुपाची आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा उंबरठ्यावर आहे. इथल्या धार्मिकतेला अंधश्रद्धा आणि भोंदुगिरी यांची दृष्ट लागणार नाही, याची काळजी प्रशासनासोबत प्रत्येक स्थानिक नागरिकाची आहे. ही सजगता अव्याहत ठेवताना वातावरण दुषित करणारी व्यक्ती कोणत्या धर्म, पंथ अथवा जाती-पातीची आहे, याचा मुलाहिजा बाळगण्यात अर्थ नाही. नाशिकच्या पावित्र्याला डंख मारणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करून बहिष्कृत करणे इष्ट ठरेल. कॅप्टनच्या काळ्या कृत्यांचे चटके केवळ नाशिकमधील नागरिकांना बसलेले नाहीत, तर इतर ठिकाणच्या व्यक्तीदेखील त्यामध्ये पोळल्या गेल्या आहेत. कॅप्टन सारख्या विकृती पुन्हा उभ्या राहू न देण्याची नैतिक जबाबदारी सर्वांचीच आहे. अघोरी धार्मिक कृत्ये करून ना अपत्यप्राप्ती होते, ना आर्थिक सुबत्ता लाभते किंवा नोकरीतील नशीब फळफळते.. हे शाश्वत सत्य गळी उतरणे आत्यंतिक गरजेचे आहे. दुर्दैवाने, ज्यांना आपण सुशिक्षित आणि पुढारलेले अशी विशेषण लावून त्यांच्याकडे आदराने बघतो, त्यांचाच कॅप्टन सारख्या विकृतांना मानाचे पान बहाल करताना पुढावा दिसला.

  सारांशात, कॅप्टन अशोक खरात सारख्या प्रवृत्ती जन्मास घालणे आणि कालौघात त्या वृद्धींगत करण्याचे पातक समाजातील काही घटक करत असतात. त्यामागे त्यांचा सहेतुक कावा असतो. वस्तुस्थितीकडे डोळेझाक करून हे घटक अशा प्रवृत्तींचा नाहक उदोउदो करतात. अशावेळी सामाजिक जाणीवेतून प्रत्येकाने त्याविरोधात उभे राहणे, आवाज उठवणे आणि ऐक्याच्या वज्र्मुठीचा प्रहार करून समाजाला नाडू पाहणाऱ्यांची योग्य व्यवस्था लावण्याची जबाबदारी निभावण्यात खरा मानवधर्म अधोरेखित करावयास हवा, एव्हढेच !        

Comments are closed.