NGN News
Latest Marathi News

रुपाली चाकणकर ‘एसआयटी’ चौकशीच्या फेऱ्यात ?

  • शिर्डीतील ‘ते’ प्रकरण अंगलट येण्याची शक्यता

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात संचालित शिवनिका संस्थानच्या माजी विश्वस्त असलेल्या रुपाली चाकणकर यांची ‘एसआयटी’ चौकशी होणार असल्याची चर्चा आहे.  विशेष तपास पथक अर्थात ‘एसआयटी’ कडून संस्थानमधील कारभार, निर्णयप्रक्रिया आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात असतानाच आता संबंधित माजी ट्रस्टींना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय, शिर्डीतील एका गुन्ह्यात महिला आयोग अध्यक्ष म्हणून चाकणकर यांनी दबाव टाकला होता, अशी माहिती पुढे आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अशोक खरात याचे महिला लैंगिक शोषण आणि तत्सम कारनामे यांची खडानखडा माहिती असलेल्या कार्यालयीन सहकारी नीरज जाधव याच्यावर दाखल गुन्ह्यात संबंधित महिलेची चौकशी होऊ नये, असा पवित्रा चाकणकर यांनी घेतला होता. संबंधित महिलेचा तक्रार अर्ज राज्य महिला आयोगाकडे मागवून पोलिसांना कारवाई करण्याची धमकी दिल्याचा आरोप असल्याने चाकणकर ह्या ‘एसआयटी’ चौकशीच्या फेऱ्यात येवू शकतात.

 ऑगस्ट 2025 मध्ये शिवनिका संस्थान विश्वस्त मंडळाची मुदत संपली असली तरी खरात याचे कारनामे काही वर्षांपासून सुरु असल्याने त्यांचा विश्वस्त मंडळाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध होता का, याची चौकशी होण्याची शक्यता आहे. अशातच शिर्डीमधील हस्तक्षेप प्रकरण माजी विश्वस्त असलेल्या चाकणकर यांच्या अंगलट येवू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. चाकणकर यांना खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर पाणी सोडावे लागले होते. मात्र तिथेच हा मुद्दा निकाली निघाला नाही. उद्या ‘एसआयटी’ चौकशीमध्ये काही तथ्य आढळल्यास त्या अडचणीत येवू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments are closed.