NGN News
Latest Marathi News

इंदिरानगर-अशोक नगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस

  • नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, महानगरपालिकेच्या निष्क्रियतेवर संताप

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : इंदिरानगर, डिजिपी नगर, ट्रान्स फिटनेच्या परिसर,बजरंग सोसायटी व राजसारथी सोसायटी मागील बाजूस तसेच विस्टा सोसायटी व समोरील रस्त्यावर कुत्र्यांचे थवेच्या थवे बसलेले आढळून येत आहेत. या संपूर्ण परिसरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा अक्षरशः हैदोस सुरू असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात कत्तल केलेल्या कोंबड्या व जनावरांचे अवशेष टाकले जात असल्याने शहरभरातील कुत्र्यांचे मोठे थवे येथे जमा होत असल्याचे समोर आले आहे. कुत्रे मोठ्या प्रमाणात कुठून येत आहेत याचाही स्थानिक स्तरावर अभ्यास (संशोधन) चा एक भाग झालेला आहे.

परिणामी, सकाळी जॉगिंगसाठी येणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे. आजच अनेक नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला करून चावे घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये नितेश कातोरे यांच्यासह अनेक जण जखमी झाले असून, स्ट्राँग फिटनेस जिम परिसरातही नागरिकांना पाडून चावे घेण्याच्या घटना घडल्या. विशेष म्हणजे मूकबधिर सिद्धार्थ पवार यांच्यावर गंभीर हल्ला झाल्याने त्यांना तातडीने बिटको रुग्णालयात दाखल करावे लागले.

या सततच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. “कारवाई सुरू आहे, कुत्रे सापडत नाहीत” अशी उडवाउडवीची उत्तरे देत प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नाशिक महानगरचे सरचिटणीस सुनील देसाई यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत इशारा दिला आहे की, “नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून तात्काळ ठोस कारवाई न झाल्यास आम्हाला पुढील तीव्र पावले उचलावी लागतील.”

दरम्यान, संबंधित ठिकाणी कत्तल अवशेष टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करून मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Comments are closed.