NGN News
Latest Marathi News

जबाबदार अधिकारी गायब; ‘कॉर्पोरेट जाळ्याचा’ संशय : भाजयुमोचा इशारा

  • मुळापर्यंत जाऊन कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार

** एनजीएन न्युज नेटवर्क

नाशिक : येथील बहुराष्ट्रीय कंपनीविरोधात भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले. महिला कर्मचाऱ्यांवरील कथित शोषण, धर्मांतराचा दबाव आणि कंपनीतील वाढत्या शिस्तभंगाच्या प्रकारांविरोधात हे आंदोलन छेडण्यात आले.

आंदोलनादरम्यान भाजयुमोच्या शिष्टमंडळाने कंपनीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून मुख्य अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या ठिकाणी कोणताही जबाबदार व निर्णयक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली.

यावेळी शिष्टमंडळाने स्पष्ट भूमिका घेतली की, दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून निवेदन देणे योग्य नसून, फक्त जबाबदार आणि मुख्य अधिकाऱ्यांसमोरच निवेदन सादर करण्यात येईल. संबंधित मुख्य अधिकारी उपस्थित झाल्यानंतरच कंपनीला निवेदन देऊन त्यांना कठोर शब्दांत जाब विचारला जाईल, असा इशारा देण्यात आला. कार्यकर्त्यांनी सांगितले की, कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून, व्यवस्थापनाची निष्क्रियता स्पष्ट दिसून येत आहे. याशिवाय कंपनी परिसरात बेशिस्त वर्तन, सार्वजनिक ठिकाणी सिगारेट सेवन व अनधिकृत पार्किंग यांसारख्या प्रकारांबाबतही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

भाजयुमोच्या वतीने पुढे असेही नमूद करण्यात आले की, या प्रकरणामागे एखाद्या ‘कॉर्पोरेट जाळ्या’चा (Corporate Network) संशय असून, त्याच्या मुळापर्यंत जाऊन संपूर्ण साखळी उघडकीस आणली पाहिजे. जोपर्यंत या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कठोर कारवाई होत नाही आणि संपूर्ण यंत्रणेचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा ठाम इशारा देण्यात आला. तसेच या कथित कॉर्पोरेट जाळ्याविरोधात रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

या आंदोलनात भाजपा नाशिक महानगर जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नेते सुनील फरांदे, सरचिटणीस सुनील देसाई, नगरसेवक शाम बडोदे, अॅड. अजिंक्य साने, सुनील खोडे, नगरसेवक चंद्रकांत खोडे, सचिन कुलकर्णी, रश्मी हीरे, भाजयुमो अध्यक्ष प्रवीण भाटे यांच्यासह प्रशांत वाघ, पवन उगले, हर्षद जाधव, निखिल खोडे, साहर दाते, तुषार नाटकर, हर्षल आहेर, निखिल पाटील, सिद्धेश संचेती, रोहन कानकाटे, प्रणीत सानप, अमोल हिंगमीरे, विकास एखंडे, संकेत खोड़े, सागर निगळ, पार्थ मानकर, अक्षय गांगुर्डे, मिहिर हजारे, भूषण सोनवणे, संकेत काळे, गोपाल राजपूत, सागर शेलार आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, या प्रकरणामुळे शहरात मोठी चर्चा निर्माण झाली असून, कंपनी व्यवस्थापनाने तात्काळ भूमिका स्पष्ट करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.

Comments are closed.