
- खा. राजाभाऊ वाजे म्हणतात, मी उबाठा पक्षासोबतच..
** एनजीएन न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नऊ खासदारांपैकी आठ खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेल्याच्या वृत्ताने राज्यभर खळबळ माजली आहे. राज्याच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असून ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरेंचा पक्ष आणखी खिळखिळा होणार असल्याच्या चर्चही रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वत: एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिले आहे.
आपल्या दरे गावी गेलेल्या शिंदेंनी सदर वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे असल्याचे स्पष्ट केले आहे. ठाकरेंचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे, असे त्यांनी माध्यमांना सांगितले.
त्या वृत्ताने प्रचंड खळबळ..
एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री शिवसेना (उबाठा ) गटातील नऊ खासदारांपैकी आठ खासदारांची बैठक घेतली असल्याचे एका वृत्तपत्रातील वृत्तात म्हटले आहे. या बैठकीत या सर्व खासदारांनी पक्षांतर करण्याचे आश्वासन दिल्याचा उल्लेखही बातमीत आहे. ठाणे येथे एका गुप्त आणि तटस्थ ठिकाणी ही बैठक झाल्याचं बातमीमध्ये नमूद केलं आहे. या बैठकीत शिंदे यांनी सहा खासदारांना प्रत्यक्ष भेट घेतली, तर आणखी दोन खासदारांनी व्हिडिओ कॉलद्वारे सहभाग नोंदवल्याची माहिती असल्याचे वृत्तात सांगण्यात आले. यामुळे राज्यभर प्रचंड खळबळ माजली.
कोण खासदार उपस्थित होते ?
अरविंद सावंत, संजय पाटील, संजय देशमुख नागेश पाटील, राजाराम वाकचौरे, ओम राजे निंबाळकर, राजाभाऊ वाजे आणि संजय जाधव. केवळ मुंबईतील अनिल देसाई हे पक्षाचे खासदार अनुपस्थितीत असल्याचे सांगण्यात येते.
खा. वाजे यांचे स्पष्टीकरण..
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीत उपस्थित असल्याच्या यादीत नाव समाविष्ट झाल्यानंतर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी स्पष्टीकरण देत आपल्या उपस्ठीतीचे खंडन केले आहे. माझा कोणाशी ना संपर्क झाला ना मी कोणाशी केला. मी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहे आणि उद्याही याच पक्षासोबत असेन, असा खुलासा त्यांनी केला आहे.
Comments are closed.