
- ५ जणांच्या चमूची निवड; ९ मे रोजी व्हर्चुअल पद्धतीने सहभागी होणार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : कझागिस्तान येथे होणाऱ्या फिडे वर्ल्ड युनिव्हर्सिटी चेस टीम चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अर्थात ‘एमयूएचएस’चा पाच सदस्यीय संघ व्हर्चुअल पद्धतीने सहभागी होणार आहे. सदर स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. यामध्ये क्वालिफाय राउंड, नॉकआउट राउंड आणि फायनल राउंडचा समावेश आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत प्राथमिक फेरीसाठी सहभागी होणाऱ्या संघात २५ वर्षांखालील डॉ. रिया काऊतकर, डॉ. श्रुती राठी, डॉ. कृष्णा शेले, डॉ. जानवी भोसले आणि डॉ. शारदा दाढे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. स्पर्ध्येमध्ये एकूण ९ संघ सहभागी होणार असून प्राथमिक फेरी येत्या ९ मे रोजी होणार आहे.
डॉ. रिया काऊतकर या लहानपणापासून बुद्धिबळ खेळत असून त्यांना आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त आहे. तसेच डॉ. श्रुती राठी यांनाही आंतरराष्ट्रीय मानांकन असून त्या देखील लहानपणापासून बुद्धिबळ क्षेत्रात सक्रिय आहेत. डॉ. रिया आणि डॉ. श्रुती यांनी विविध बुद्धिबळ स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे दोघीही मेडिकल शिक्षण घेत असताना बुद्धिबळ क्षेत्रातही उल्लेखनीय यश संपादन करत आहेत. या खेळाडूंना अंजली काऊतकर, डॉ. विशाल खंडारे, शिक्षक सप्तशृंगी, स्वप्निल बनसोड (नागपूर), कमल नयन देशमुख (परभणी), अनिल शेलगावकर (परभणी), सतीश ठाकूर, अमरीश जोशी, डॉ. विठ्ठल खिल्लारे आणि रास कटला सर यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेची अंतिम फेरी येत्या ऑगस्ट महिन्यात होणार आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व्यवस्थापनाच्या वतीने सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
Comments are closed.