NGN News
Latest Marathi News

जिल्हा शिवसेनेत खांदेपालट; आ. कांदे, भाऊसाहेब चौधरी नवे सुभेदार

नाशिक लोकसभा क्षेत्र संपर्क नेतेपदी आ. कांदे; दिंडोरी-धुळ्याची जबाबदारी भाऊसाहेब चौधरींकडे

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांत चांगले यश मिळवल्यानंतर शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याच्या उद्देश्याने मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यात मोठे फेरबदल केले आहेत. त्यानुसार, नाशिक लोकसभा क्षेत्र संपर्क नेतेपदी आ. सुहास कांदे यांची तर भाऊसाहेब चौधरी यांची दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदार संघ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षातील वाढती गटबाजी संपुष्टात आणण्याच्या हेतूने केलेले हे बदल कितपत प्रभावी ठरतात, हे पाहणे यानिमित्त महत्वाचे ठरणार आहे.

आधीच्या टप्प्यात झालेल्या नगर परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने नाशिक जल्ह्यात घवघवीत यश मिळवले होते. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सटाणा, नांदगाव आणि मनमाड या राजकीयदृष्ट्या महत्वाच्या शहरांत पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आले. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत नाशिक आणि मालेगाव येथे पक्षाचे अनुक्रमे २६ आणि १८ नगरसेवक निवडून आले. विशेष म्हणजे या निवडणुकांत भाजप सोबत युती नसताना पक्षाने घवघवीत यश प्राप्त केले. तथापि, महापालिका निवडणूक झाल्यानंतर नाशिक महापालिकेत शिवसेना आणि भाजप यांची युती जाहीर झाली. उपमहापौरपद सेनेच्या वाटेला येणे निश्चित झाल्यावर अचानक विलास शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली आणि पक्षांतर्गत राजकारणात वादाची ठिणगी पडली. महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी आपण उपमहापौर पदाचे दावेदार असताना उपनेते अजय बोरस्ते यांनी पक्षात अलीकडे आलेल्या विलास शिंदे यांना ‘प्रोजेक्ट’ केल्याचा आरोप करीत राजीनाम्याची घोषणा केली. मात्र त्यांची समजूत काढण्यात आल्यानंतर तिदमे यांनी राजीनाम्याचा निर्णय फिरवला. तथापि, पक्षातील गटबाजी कायम राहिली.

याच पार्श्वभूमीवर आता पक्षात नवीन नियुक्त्या करण्यात आल्याचे सांगण्यात येते. आ. कांदे यांच्यावर विश्वास ठेवत पक्ष नेतृत्वाने त्यांना नाशिक लोकसभेची जबाबदारी दिली. जिल्ह्यात मराठा समाजापाठोपाठ वंजारी समाजाचे असलेले वर्चस्व, आक्रमकता, प्रखर भुजबळ विरोधक या मुद्द्यांवर आ. कांदे यांना बढती देण्यात आल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे, जिल्हा राजकारणात काही काळ बाजूला फेकल्या गेलेल्या भाऊसाहेब चौधरी यांचे पुनर्वसन करण्यात येवून त्यांच्याकडे दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या बागलाण, मालेगाव बाह्य आणि मालेगाव मध्य या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दादाजी भुसे यांचे काय ?

राज्य मंत्रिमंडळात नाशिकचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दादाजी भुसे यांना संघटनात्मक स्तरावर कोणतेही स्थान न देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भुसे ज्या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, तो धुळे लोकसभा क्षेत्रात यात असूनही तिथे चौधरी यांना जबाबदारी देण्यात आली. जिल्ह्यात अजय बोरस्ते यांच्याकडे आधीच उपनेतेपद असल्याने भुसे यांच्याकडे आता काय जबाबदारी दिली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Comments are closed.