NGN News
Latest Marathi News

डॉ. आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी उपक्रम

  • जिल्हा महिला व बचत गट विकास सहकारी पतसंस्था- जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेचा पुढाकार

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिक जिल्हा महिला व बचत गट विकास सहकारी पतसंस्था तसेच जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी चैतन्य ज्योती महिला बचत गटाच्या सभासदांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे डेव्हलपमेंट ऑफिसर अखिलेश बोरस्ते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी चैतन्य ज्योती बचत गटातील दैवशाला खडसे, सरला आहेर, प्रतिभा नरवडे, भारती मराठे, हेमलता पाटील, शारदा अहिरे व आकांक्षा या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करत महिला सशक्तिकरण, समानता, न्याय, बंधुता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. बाबासाहेबांनी दिलेल्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या संदेशाचा आजच्या काळातही समाजपरिवर्तनासाठी मोठा आधार आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.
संस्थेच्या कार्याबाबत बोलताना असे नमूद करण्यात आले की, नाशिक जिल्हा महिला व बचत गट विकास सहकारी पतसंस्था आणि जिजाऊ महिला सेवाभावी संस्था या केवळ आर्थिक व्यवहारापुरत्या मर्यादित नसून त्या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देणे, त्यांच्या नेतृत्वगुणांना वाव देणे, शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणे, या विविध अंगांनी संस्थेचे कार्य महिला सशक्तिकरण या व्यापक ध्येयाने प्रेरित आहे.

प्रत्येक महिलेमध्ये असलेली क्षमता ओळखून तिला योग्य संधी उपलब्ध करून देणे, तिचा आत्मविश्वास वाढवणे आणि तिला स्वयंपूर्ण बनवणे, हीच बाबासाहेबांच्या विचारांची खरी अंमलबजावणी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करत समाजात समानता, न्याय, बंधुता आणि शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त समाज उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बचत गट समन्वयक दिपाली मुकणे यांनी केले. तसेच दर्शन पोळ, शीतल महाजन व सोनाली भारस्कर यांनी विशेष प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

Comments are closed.