
- नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : महायुतीच्या नरेंद्र दराडे यांचा दारूण पराभव; शिवसेनेला मोठा धक्का
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अत्यंत धक्कादायक उलटफेर झाला. निवडणुकीतून माघार घेतल्याची केवळ चर्चा असलेल्या आणि भाजपमधून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पूर्ण करत गोकुळ गीते यांनी नाशिकच्या गडात ऐतिहासिक विजय संपादित केला आहे. या पराभवामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात महायुतीला, विशेषतः शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या १८ जून रोजी झालेल्या या निवडणुकीत एकूण ६१९ पैकी ६१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीदरम्यान यातील १३ मते अवैध ठरवण्यात आल्यामुळे एकूण ६०५ मते वैध ठरली. या वैध मतांच्या आधारे विजयासाठी ३०३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. सकाळी काहीशा उशीराने मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली. एकूण ४ टेबलांवर पार पडलेल्या या मतमोजणीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी तब्बल ३५७ मते मिळवत विजयाचा टप्पा सहज पार केला. तर महायुतीचे नरेंद्र दराडे यांना केवळ २४८ मते मिळवता आली. दुसऱ्या बाजूला, निवडणुकीच्या रिंगणात असलेले आणखी एक उमेदवार प्रसाद हिरे यांना शून्य मते मिळाली. पहिल्याच फेरीत गोकुळ गीते यांनी ३०३ चा कोटा पार केल्यामुळे त्यांनी पहिल्याच फेरीत हा खेळ संपवला.
निकालाआधीच मोठा तणाव
निकालापूर्वी आज मतमोजणी केंद्रावर कमालीचा तणाव पाहायला मिळाला होता. गोकुळ गीते यांनी मतमोजणी कक्षात पोहोचताच नरेंद्र दराडे यांचे बंधू आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीवर तीव्र आक्षेप घेतला होता. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कोणत्याही विद्यमान लोकप्रतिनिधीला मतमोजणी कक्षात प्रतिनिधी म्हणून बसता येत नाही, असा मुद्दा मांडत गीतेंनी वकिलांना पाचारण केले होते. या मुद्द्यावरून मतमोजणी कक्षातच गीते आणि दराडे यांचे समर्थक आमनेसामने आले होते आणि त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. या गोंधळानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन शंका निरसन केले आणि पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया सुरू ठेवली.
महायुती नेत्यांकडून विश्वासघात : दराडे बंधूंचा आरोप
दरम्यान, अंतिम निकालाचा अंदाज आल्यानंतर महायुती उमेदवार नरेंद्र दराडे आणि त्यांचे बंधू आ. किशोर दराडे यांनी मतमोजणी केंद्रावरून काढता पाय घेताना महायुती नेत्यांवर शरसंधान केले. आमचा ठरवून विश्वासघात करण्यात आला. वस्तुस्थितीपासून आम्हाला अंधारात ठेवण्यात आले. महायुती घटक पक्षांतील नेत्यांनी शब्द पाळला नाही. आमच्या पराभवास हे नेतेच कारणीभूत असल्याचा घणाघात दराडे बंधूनी केला. मतदान झाले त्यादिवशी नरेंद्र दराडे यांनी थेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करीत त्यांच्या आधिपत्याखालील येवला येथील नगरसेवकांनी विरोधी उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप केला होता.
Comments are closed.