NGN News
Latest Marathi News

पक्षविस्ताराच्या वाटेवर गटबाजीचे काटे .. ! ( सारीपाट/मिलिंद सजगुरे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क

भाजपचे बोट धरून राज्याच्या राजकारणात बऱ्यापैकी पाय रोवलेल्या एकनाथ शिंदे प्रणित शिवसेनेला आता विस्ताराचे वेध लागले आहेत. त्यासाठी जोर-बैठका, मेळावे आयोजित करून रणनीती आखण्याचे काम जोमाने सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून संपर्कमंत्रीपदी नियुक्त झालेल्या उदय सामंत यांच्या उपस्थितीत नाशकात मेळावा पार पडला. पंख पसरण्यासाठी प्रत्येक पक्ष मेळाव्यांचे सोपस्कार पार पाडत असला तरी राज्याच्या सत्तेतल्या दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाचा मेळावा विशिष्ट कारणांमुळे गाजला. वस्तुत:, नियुक्तीनंतर बिनीचा मेळावा होत असल्याने सामंत आणि प्रभृतींना मोठ्या उपस्थितीची अपेक्षा होती. मात्र, पक्षातील गटबाजी थेट जाणवली नसली तरी ‘रित्या’ आसनांनी सामंतांना द्यायचा तो संदेश दिला. या मर्यादित उपस्थितीने स्थानिक पदाधिकाऱ्यांची ‘हजेरी’ घेण्याची वेळ संपर्क मंत्र्यांवर आली. अर्थात, राजकीय अंगाने अशी कानटोचणी करून गाव-शीव ओलांडताना तिथेच सारे झटकून जाण्याची परंपरा सामंत जोपासतात की खरोखर निष्क्रियांना घरचा रस्ता दाखवतात, याकडे किमान निष्ठावान ‘सैनिकां’चे लक्ष लागून राहणार आहे.

मातोश्री’ सोबत पंगा घेत नवा राजकीय डाव सुरू करणारा भाईंचा पक्ष तसा जन्मत:च सत्तेमध्ये बसला. स्वाभाविकच, एकीकडे निष्ठा दाखवत दुसरीकडे हळूच सत्तेची ऊब मिळवण्याचा आटापिटा करणाऱ्यांची संख्या या पक्षात अधिक राहिली. अपेक्षांच्या हिशेबाचा हा आलेख नाशकातही वर्धिष्णू राहिला. पक्षप्रवेशासोबत काहीतरी पदरात पाडून वा तसा शब्द घेण्यात वाकबदार असलेल्यांनी भाईंसमोर शक्तीप्रदर्शन करण्याची थोडीही संधी सोडली नाही, ज्याची बक्षिसी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मिळवण्यात ते यशस्वी झाले. ‘माझ्यामुळे पक्ष, पक्षामुळे मी थोडाच आहे..’ ही वृत्ती प्रत्येक दहापैकी आठ जणांत भिनत गेल्याने पक्षात गटबाजीची लागण होत गेली. मंत्री, आमदार, दोन उपनेते, तीन जिल्हाप्रमुख, ढीगभर पदाधिकारी.. एव्हढा गोतावळा असूनही पक्ष अपेक्षेनुरूप बाळसे धरू शकला नाही. परस्परांच्या पतंगी काटण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवण्यात नेते मंडळींचीच आगतिकता दिसून आली. त्याचा पहिला फटका नाशिक महापालिका निवडणूकीत पक्षाला बसला. भाजपला शिंगावर घ्यायला निघालेल्या भाईंच्या शिवसेनेला जागांची पंचविशी कशीबशी गाठता आली. गेल्या लोकसभा निवडणूकीत उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासोबत शरीराने किती आणि मनाने किती पदाधिकारी होते, याचा हिसाबकिताब तर वेगळाच आहे. अंतर्गत गटबाजीने हैराण होऊन डॉ. हेमलता पाटील यांच्यासारखा राज्यस्तरिय चेहरा महिनाभरात ‘जय महाराष्ट्र’ म्हणत पक्षाबाहेर गेला. मात्र, तरीही यादवी थांबता थांबत नसेल तर पक्षाचे भवितव्य काय, हे सांगायला ज्योतिषाची गरज पडू नये.

परोक्त ‘फ्लॅशबॅक’ लक्षात घेता भाईंच्या शिवसेनेतील गटबाजी हा काल-परवाचा मामला नाही, हे स्पष्ट होते. लोकसभा-विधानसभा महायुतीत लढून दखलपात्र यश मिळवल्याने पक्षाची नेमकी ताकद किती, याचा अदमास बांधणे तसे कठीण होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत ग्रामीण भागात स्वबळ अजमावताना मिळालेले यश शिवसेनेला उभारी देणारे ठरले. हाच धागा पकडून पक्षाने आता जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूका डोळ्यासमोर ठेवून संघटना समन्वय वृध्दींगत होण्यासाठी पावले टाकण्यास प्रारंभ केलाय. आताचा सामंतांच्या उपस्थितीतील मेळावा त्याच रणनीतीचा भाग होता. मात्र, संपर्कमंत्री म्हणून मिळालेल्या ‘सलामी’ने सामंत चांगलेच संतप्त झाले. निष्ठेने काम करण्याची भाषा त्यांना उपस्थितांसाठी वापरावी लागली. शिवाय, ‘पक्षामुळे मी आहे’, ही भावना स्वत:मध्ये रूजवण्याचा डोसही द्यावा लागला. पक्षाचे नुकसान करणाऱ्यांना खपवून घेणार नाही, हा सामंतांचा इशाराही बोलका ठरावा. मेळाव्यातील रिकाम्या खुर्च्या पक्षातील स्थानिक संघटना विकलांगतेचे दर्शन घडवणारी बाब ठरली. पक्षामध्ये ‘नेते हातभर अन् कार्यकर्ते वीतभर’ अशी अवस्था झाली. आमदार सुहास कांदे यांनीदेखील संपर्कमंत्र्यांच्या सुरांत सूर मिसळवत पक्षातील गटबाजीवर बोट ठेवले. सत्तेमध्ये असलो तरी पक्ष संघटनेला नेहमीच प्रधानस्थानी ठेवायचे असते, हा भाजपचा शिरस्ता मांडीला मांडी लावून बसूनही शिवसेनेला अंगी बाणता आला नाही. संघटनेसह क्षेत्रातील बलस्थाने मानल्या जाणाऱ्या संस्था ताब्यात ठेवणेही पक्षाचा ‘युएसपी’ मानला जातो. नांदगाव तालुका वगळता शिवसेनेला हे प्रमेय सत्तेत असूनही साधता आलेले नाही. वर्षानुवर्षे मंत्रिपदाची झूल अंगावर असूनही दादा भुसे यांना मालेगाव वगळता जिल्ह्यात प्रभाव पाडता आला नाही. पक्ष केवळ चर्चेत आहे, त्याचे अस्तित्व कुठेय, हे आ. कांदे यांचे वाक्य पदाधिकाऱ्यांना मिरच्या झोंबणारे वाटत असले तरी ते वास्तवाधारित असल्याचे खासगीत कोणीही नाकारणार नाही.

सारांशात, ‘ठेविले अनंते, तैसेचि राहावे..’ या प्रमेयाशी नाते सांगणाऱ्यांचे राजकारणातील प्रगतीपुस्तक ‘वरच्या वर्गात पाठवले’ असा शेरा मारलेल्या विद्यार्थ्याप्रमाणे अदखलपात्र असते. तीनशे पासष्ट दिवस राजकारण करण्याच्या वृत्तीमुळेच मोदी-शहांच्या नेतृत्वातील भाजपला आज आसेतुहिमालय यश पाहण्याचे भाग्य लाभले. एकनाथ शिंदे यांची स्वप्ने मोठी असली तरी त्यांना यशाचे नभांगण दाखवू शकणारेच जर गटबाजीच्या गर्तेत अडकणार असतील तर परिणाम व्हायचा तोच होणार आहे. जिल्ह्यातील पाच नगर परिषदांत लोकनियुक्त अध्यक्ष निवडून आल्याचे भांडवल करून त्याचा नाशिक महापालिका निवडणूकांत लाभ उठवण्यात पक्षनेतृत्व सपशेल अपयशी ठरल्याचे म्हटल्यास ती अतिशयोक्ति ठरू नये. मी आणि माझे शागीर्द निवडून यावेत, बाकी पक्ष त्याचे काय ते बघेल, या स्थानिक नेत्यांमधील वृत्तीमुळे नाशिक महापालिकेत किमान डझनभर जागा गमवाव्या लागल्या. आता उदय सामंतांनी टोचलेले कान आणि तदनुषंगिक दिलेला इशारा यामधून संबंधित काही बोध घेतात की ‘उपासनेला दृढचाल’ होण्यात स्वमग्न राहतात, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Comments are closed.