NGN News
Latest Marathi News

फुटीर भाजप नगरसेवक चौकशी फेऱ्यात; अहवाल तयार होणार

  • प्रदेश नेतृत्वाकडून गंभीर दखल; निवडणुकीत महायुतीच्या २१८ जणांकडून ‘क्रॉस व्होटिंग’

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : निवडणूकपूर्व बंडखोरी आणि निकालापश्चात अभूतपूर्व मत फुटीमुळे राज्यभर गाजलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील निवडणुकीतील घडामोडींची भाजप नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. निवडणुकीत महायुतीची तब्बल २१८ मते अपक्ष उमेदवाराच्या पारड्यात गेलीत तर १३ मते बाद ठरलीत. यामध्ये भाजप नगरसेवकांचे नेमके योगदान किती, याची चौकशी करण्याचे निर्देश नेतृत्वाने दिल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहे. दरम्यान, पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी यांनी चौकशी आदेश प्रक्रिया सुरु झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

नाशिक मतदारसंघाची निवडणूक विविध कारणांनी राज्यभर गाजली. महायुतीकडून शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर झाली असताना भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी दराडे यांच्याविरुध्द शड्डू ठोकून महायुती नेतृत्वाची धाकधूक वाढवली होती. त्यानंतर गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादाजी भुसे या मंत्रीगणांनी गीते यांची समजूत काढून त्यांना निवडणूक लढवण्यापासून परावृत्त केले होते. तथापि, ही घडामोड माघारीनंतर झाल्याने प्रत्यक्षात मतपत्रिकेवर दराडे यांच्यासोबत गीते यांचेही नाव येणे अनिवार्य ठरले. मतमोजणीत धक्कादायक निकाल लागला आणि गोकुळ गीते यांनी दराडे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

निवडणुकीत ४६६ नगरसेवकांचे संख्याबळ असताना महायुती उमेदवाराचा पराभव झाला. दराडे यांना केवळ २८९ मते मिळालीत. महायुतीची तब्बल २१८ मते फुटलीत. यामध्ये तीनही घटक पक्षांतील नगरसेवकांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. पराभूत उमेदवार दराडे यांच्यासह त्यांचे बंधू आ. किशोर दराडे यांनी थेट तीनही मंत्र्यांना पराभवास जबाबदार धरले. भाजप नेतृत्वाने फुटलेल्या मतांची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. पक्षाची नेमकी कोणती आणि कोणाची मते गीते यांच्याकडे वळती झाली, याची चौकशी करून त्याचा अहवाल सदर करण्याचे निर्देश शहराध्यक्ष सुनील केदार यांना देण्यात आले आहेत. यामुळे भाजप नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. चौकशीत नेमके कोण दोषी ठरतात, याकडे लक्ष लागून राहणार आहे.

@ निवडणुकीत पक्ष नगरसेवकांचे नेमके किती आणि कोणी क्रॉस व्होटिंग केले, याचा अंदाज नाही. मात्र महायुतीमधील सहकारी पक्षांसोबत भाजपची काही मते अपक्ष उमेदवाराच्या पारड्यात पडल्याचे सकृतदर्शनी जाणवते आहे. वस्तुतः, निवडणुकीपूर्वी ‘कॅम्प’मध्ये सर्वाना पक्षशिस्त आणि पक्षादेशाची कल्पना देण्यात येवूनही काही मते फुटली, हे दुर्दैव आहे. प्रदेश नेतृत्वाने त्याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्या दिशेने काम सुरु करण्यात आले असून लवकरच अहवाल सादर करण्यात येईल.

  • सुनील केदार, अध्यक्ष, भाजप नाशिक

Comments are closed.