
- नवीन नाशिक परिसरात धक्कादायक घटना; सखोल चौकशीची पालकांची मागणी
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेच्या लसीकरण शिबिरात लस घेतल्यानंतर काही वेळातच १७ वर्षीय मुलगी अचानक चक्कर येऊन मृत्यूमुखी पडल्याची घटना बुधवारी नवीन नाशिक परिसरात घडली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. श्रावणी अनिल पाटील असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत श्रावणीने बुधवारी दुपारी लस घेतली. त्यानंतर तिला चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. तिच्या कुटुंबीयांनी तिला शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र तिला मृत घोषित करण्यात आले. एक सुदृढ मुलगी केवळ लस घेतल्याने कशी मृत्युमुखी पडू शकते, असा संतप्त सवाल तिच्या पालकांनी महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांना यावेळी केला. श्रावणीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणीही वडील अनिल पाटील यांनी केली आहे.
त्या बाटलीतून सहा व्यक्तींना लस
जिल्हा रुग्णालयात श्रावणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला. दरम्यान, श्रावणीला ज्या बाटलीमधून लास देण्यात आली, त्या बाटलीचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी दिली. त्या बाटलीतून एकूण सहा व्यक्तींना लस देण्यात आली. त्यामधील केवळ श्रावणीला चक्कर येवून ती मृत्युमुखी पडल्याचे डॉ. देवकर म्हणाले. प्रत्यक्ष अहवालानंतर तिच्या मृत्यूचे कारण समोर येईल.
Comments are closed.