
- मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना साकडे
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्यात अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला असून नगदी पिकांना उत्पादन खर्चाइतकेही दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने गेल्या वर्षी बंद केलेली ‘एक रुपयात पीक विमा योजना’ तात्काळ पूर्ववत सुरू करून बळीराजाला दिलासा द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे व कृषीमंत्री दत्ता भरणे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले. निवेदनात, राज्यातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने हजारो हेक्टरवरील खरीप पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. कर्ज काढून महागडी बियाणे, खते व औषधे खरेदी करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट उभे आहे. दुसरीकडे कांदा, कापूस, सोयाबीनसह विविध नगदी पिकांना अत्यल्प दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नसून शेती तोट्याचा व्यवसाय बनत चालला आहे.
गेल्या वर्षापासून ‘एक रुपयात पीक विमा योजना’ बंद झाल्याने शेतकऱ्यांना २ ते ५ टक्के अतिरिक्त विमा हप्ता भरावा लागत आहे. मात्र नुकसान झाल्यानंतर विमा कंपन्या तांत्रिक कारणे पुढे करून दावे फेटाळत असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत असून विमा कंपन्याच नफ्यात राहत असल्याचा आरोपही त्यांनी केला. म्हणूनच शासनाने ‘एक रुपयात पीक विमा योजना’ कोणत्याही अटींशिवाय तात्काळ पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
Comments are closed.