
- दोन महिन्यांत १,०१६ टन निर्यात
**एनजीएन न्यूज नेटवर्क
लासलगाव : राकेश बोरा
कांद्याच्या बाजारपेठेसाठी ओळखल्या जाणाऱ्या लासलगावने आता आंबा निर्यातीच्या क्षेत्रातही आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक विकिरण केंद्रातून अवघ्या दोन महिन्यांत तब्बल १,०१६ मेट्रिक टन हापूस आणि केशर आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून त्याची अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि मलेशिया येथे निर्यात करण्यात आली आहे.अमेरिके मध्ये सर्वाधिक ९९७ मेट्रिक टन आंबा निर्यात झाला असून ऑस्ट्रेलिया मध्ये १३ मॅटिक टन तर मलेशियामध्ये ३ मॅटिक टन आंब्याची निर्यात झालेली आहे
सुमारे तीन लाख बॉक्समधील आंब्यांवर प्रक्रिया पूर्ण करून ते परदेशात रवाना करण्यात आले असून, यामुळे महाराष्ट्रासह देशातील आंबा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रकल्प अधिकारी संजय आहेर यांनी ही माहिती दिली.
आंबा निर्यातीसाठी अमेरिकेच्या कृषी व वनस्पती सुरक्षा निकषांनुसार आवश्यक असलेली तपासणी प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. अमेरिकेतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लासलगाव केंद्राची पाहणी करून आवश्यक प्रमाणपत्र दिल्यानंतर निर्यातीचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे हंगामात निर्यातदार आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
कांद्यापासून आंब्यापर्यंतचा प्रवास
लासलगाव येथील विकिरण केंद्रात २००२ ते २००६ या कालावधीत केवळ कांद्यावर विकिरण प्रक्रिया केली जात होती. २००७ पासून आंब्यालाही या प्रक्रियेचा लाभ मिळू लागला. सुरुवातीला भाभा अणुसंशोधन केंद्र आणि पणन मंडळाच्या नियंत्रणाखाली असलेला हा प्रकल्प नंतर खासगी व्यवस्थापनाकडे गेला. सध्या हिंदुस्थान अॅग्रो लिमिटेड या कंपनीकडे केंद्राची जबाबदारी आहे.मागील वर्षी आवश्यक प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याने आंबा निर्यात ठप्प झाली होती. मात्र यंदा सर्व परवानग्या वेळेत मिळाल्याने निर्यातीत मोठी वाढ झाली आहे.
विकिरण प्रक्रियेचा नेमका फायदा काय?
कोकणातील प्रसिद्ध हापूस (अल्फान्सो) आणि गुजरातमधील केशर आंबा लासलगाव येथे आणून त्यावर गॅमा किरणांद्वारे प्रक्रिया केली जाते. या तंत्रज्ञानामुळे आंब्यातील कीड नष्ट होते, फळ अधिक काळ टिकते आणि त्याची चव, रंग व ताजेपणा कायम राहतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कठोर निकष पूर्ण करणे शक्य होते.
आणखी देशांकडे निर्यातीची तयारी
लासलगाव केंद्रातून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आणि मलेशिया या देशांकडे आंबा निर्यात होत आहे. भारतातून दरवर्षी सुमारे ५० हजार टन आंब्याची निर्यात होते. त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असून, यंदा हंगामअखेर निर्यातीचा आकडा लक्षणीय वाढण्याची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण
हापूस, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, दशहरा, लंगडा आणि चौसा यांसारख्या भारतीय आंब्यांच्या विविध जातींना परदेशात मोठी मागणी आहे. लासलगावमधील विकिरण केंद्रामुळे निर्यातीला नवे बळ मिळत असून, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही व्यवस्था उत्पन्नवाढीची महत्त्वाची संधी ठरत आहे.
कांद्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेले लासलगाव आता ‘आंबा निर्यातीचे प्रवेशद्वार’ म्हणूनही ओळख निर्माण करत असल्याचे चित्र यंदाच्या हंगामात दिसून येत आहे.
लासलगाव कृषकमधून झालेली आंबा निर्यात
वर्ष – निर्यात (टन)
२००७ – १५७
२००८ – २७५
२००९ – १२२
२०१० – ९६
२०११ – ८५
२०१२ – २१०
२०१३ – २७५
२०१४ – ३२८
२०१५ – ३२८
२०१६ – ५६०
२०१७ – ६००
२०१८ – ५८०
२०१९ – ६८५
२०२० – कोरोना
२०२१ – कोरोना
२०२२ – ३६०
२०२३ – १०००
२०२४. ११००
२०२५… निर्यात नाही
Comments are closed.