
** एनजीएन न्यूज नेटवर्क
स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात.. कथित ‘एनजीओ’ संचालक तथा माध्यमकर्मी रवींद्र एरंडे आणि एका बहुराष्ट्रीय कंपनीतला बहुचर्चित ‘कॉर्पोरेट जिहाद’.. महिनाभरातील या तीन प्रकरणांनी नाशिकची नकोशी अशी सार्वत्रिक चर्चा घडवून आणलीच, शिवाय, शहराच्या सभ्यतेला बदनामीचा विखारी डंख मारला. गरजू आणि अडल्या-नडलेल्या अबलांच्या शरीराचे लचके तोडणे हा तीनही प्रकरणांतला संतापजनक समान धागा ठरला. कोणाच्या तरी सहकार्याने, मार्गदर्शनाने आपल्या जीवनात बदल घडेल, वेगळ्या भरारीची स्वप्नपूर्ती होईल, अशा भाबड्या भावनेपायी ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच हतबलता ओळखून वासनेची शिकार बनवल्याचे दुर्दैव शेकडो महिलांच्या वाटेला आले. समाजातील प्रत्येक सजग घटकाचे मन पेटवणारा, विचलित करणारा हा प्रकार केवळ धक्कादायकच नाही तर अबलेला सबलेचे स्थान दिल्याच्या गप्पा मारणाऱ्या कथित व्यवस्थेचा पोकळपणा उघड करणारा ठरला आहे.
उपरोल्लिखित तीनपैकी दोन प्रकरणे व्यक्तीकेंद्रित तर तिसरे सामुहिक प्रभावाने महिलांच्या अब्रूचे लचके तोडणारे ठरले. यामधील प्रत्येक व्यक्ती मृत्यदंड देण्यापेक्षा कमी पात्रतेची ठरू शकणार नाही. तत्राप, या मालिकेतील तिसरे प्रकरण अर्थात बहुराष्ट्रीय कंपनीतला बहुचर्चित ‘कॉर्पोरेट जिहाद’ समाजमन बिथरवणारा आहे. आजच्या भाषेत सर्वात ‘क्रीम जॉब’ देणाऱ्या आयटी क्षेत्रात काय विपरीत घडू शकते, याचा धक्कादायक दाखला नाशिकमधील या कंपनीत प्रत्ययास आला आहे. लैंगिक शोषणासोबत धार्मिक कट्टरतेचे भयानक जाळे पसरवण्यात इथल्या व्यवस्थेतील म्होरकेच कार्यप्रवण असल्याचे खळबळजनक वास्तव यानिमित्त उघड झालेय. रोजगार देण्यासोबतच वासनांधता आणि धर्मांतरासाठी तरुणींचे ब्रेनवॉश करण्याचे पातक बाहेरून चकचकीत भासणाऱ्या या इमारतीत काही वर्षांपासून अव्याहत सुरु होते. करियरभिमुख तरुणी रोजगाराच्या अपेक्षेने ज्याला आश्रयस्थान मानत, त्याच आस्थापनेतील धर्मांतराचा ‘मास्टरगेम’ नाशिकच्या कॉर्पोरेट जगताला बदनाम करणारा ठरला.
या कथित कंपनीत बव्हंशी तरुणींना प्राधान्याने सामावून घेतले जाण्यासह तिथल्या ‘टर्न आउट’ ची तशी प्रथमपासूनच वंदता होती. तरुणींचा विनयभंग, लैगिक आणि मानसिक छळ, धार्मिक भावनांची पायमल्ली, धर्मांतरासाठी दबावतंत्र हीच तिथल्या महिला कर्मचारी द्रुतगतीने बाहेर पडण्याची कारणे होती, याची संतापजनक उकल काही प्रकरणांनी करून दिली. विशेषत:, चार वर्षांपासून कंपनीत कार्यरत असलेल्या एका तरुणीच्या वागण्यातील बदलाने कंपनीतील काळ्या दुष्कृत्यांचा भांडाफोड झाला. कंपनीत विशिष्ट समाजातील ‘टीम लीडर्स’कडून तरुणींचे पद्धतशीरपणे ‘ब्रेनवॉश’ करणे, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाहाचे आमिष दाखवणे, त्यांच्या धर्मांतरासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आदी बहु’उद्देशीय’ उद्योग या बहुराष्ट्रीय कंपनीत गेल्या काही वर्षांपासून सुरु होते. या प्रकरणाची उकल करण्यासाठी नाशिक पोलिसांनी उचललेली पावलेही प्रशंसेस पात्र आहेत. कारण अगदी फिल्मी स्टाईलने महिला पोलीस पथकाने वेशांतर करून प्रत्यक्ष कंपनीत वावरणे आणि वस्तूस्थिती जाणून घेण्याचे धाडस करणे तेव्हढे सोपे नव्हते. या पथकाने चाळीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून ठोस पुरावे गोळा केले आणि त्यानंतर आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
पाच टीम लीडर्सना महिला ‘एचआर’ प्रमुखाची साथ मिळत गेल्याने आत काय चालत होते, याची वाच्यता होण्यास पुरते काही वर्षे लागले. पण यासाठी वापरलेली ‘मोडस ऑपरंडी’ धक्कादायक होती. नोकरीच्या मुलाखतीपासूनच तरुणींना लक्ष्य करून त्यांच्या असहायतेचा फायदा घेतला जाई. कंपनी धोरणामुळे नाही तर आमच्या मेहेरनजरेमुळे तुम्ही नोकरीवर आहात, अशी बाब तरुणींवर या कथित टोळक्याकडून बिंबवली जायची. म्हणूनच अगदी शारीरिक अत्याचार होईपर्यंत काही तरुणींनी अन्याय सहन करण्याची भूमिका ठेवली. पण शेवटी पापाचा घडा भरला आणि या मंडळींचा गेम ‘खल्लास’ झाला. बडी नामाभिधाने लागलेल्या प्रतिष्ठित कंपन्यांमध्येही महिला सुरक्षित नसल्याचे नाशिकमधील घटनेने अधोरेखित केले. आज एका ठिकाणी हे रॅकेट उघडकीस आले. अशी काही अन्य अस्थापना आहेत का, जिथे महिला कर्मचारी कथित पुरुष ‘बॉसेस’च्या वासनेच्या बळी ठरताहेत, याचा पोलिसांनी शोध घ्यायला हवा. एव्हढेच नाही तर वस्तुस्थितीधारित तक्रार केल्यानंतर ‘जॉब सिक्युरिटी’चा मुद्दा सरकारी पातळीवर सबळ होणे गरजेचे आहे. ही सामाजिक सुरक्षाच समाजाला कलंकित करणाऱ्या अशा घटनांना रोखू शकतात.
सारांशात, नाशिकमध्ये अलीकडे घडलेल्या तीन घटनांमुळे निर्माण झालेली सामाजिक अस्वथता दूर होणे गरजेचे आहे. किंबहुना, ही अस्वथता निर्माण करण्याचे अपश्रेय असलेल्या व्यक्ती वा व्यवस्था बहिष्कृत करण्याचे धाडस शहरवासीयांत निर्माण होणे आत्यंतिक गरजेचे आहे. सत्तेतल्या भाजपने संबंधित कंपनीविरोधात घेतलेला पवित्रा इतर राजकीय पक्षांसाठी पथदर्शी आहे. एरव्ही लहानसान गोष्टींचा निषेध करणारे, रस्त्यावर येण्याची भाषा करणारे किंवा किमान समाज माध्यमांवर ‘टिवटिवाट’ करणारेही अशा प्रसंगी कार्यप्रवण होणे गरजेचे आहे. हे सामाजिक ऐक्य, अत्याचाराला विरोध करणारी वज्रमुठ निर्ढावलेल्या मनांवर प्रहार करण्यास पुरेशी ठरेल, यानिमित्त एव्हढेच !
Comments are closed.