
- खरात याच्या सीडीआरची कॉपी अंजली दमानिया यांच्या हाती
** एनजीएन न्यूज नेटवर्क
मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात याचे महिला लैंगिक शोषणासोबतच आर्थिक फसवणुकीचे गुन्हे समोर येत असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नवा बॉम्बगोळा टाकला आहे. खरात याच्या सीडीआरची कॉपी मिळाल्याचा दावा करत दमानिया यांनी त्याच्यासोबत कोणत्या ‘व्हीआयपीज’चे संभाषण झाले याची जंत्री जाहीर केली आहे. यामध्ये रुपाली आणि प्रतिभा या चाकणकर भगिनींसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, खासदार सुनील तटकरे यांचा समावेश असल्याचे दमानिया यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. विशेष म्हणजे यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना आपण दिल्याचेही दमानिया म्हणाल्या.
अंजली दमानिया म्हणाल्या, अशोक खरातसोबत सगळ्यात जास्त वेळ कोणाचा संवाद झाला, याची माहिती घेतली असता खरात याची कन्या तृप्ती हिच्यानंतर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा सर्वाधिक संवाद झाल्याचे स्पष्ट झाले. रूपाली चाकणकर आणि खरात यांच्यात 33 हजार 727 सेकंद एवढा वेळ संवाद झाला तर त्यांची बहिण प्रतिभा चाकणकर यांचे 236 कॉल्स अशोक खरातला झालेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे २१ मिनिटांच्या अवधीचे एकूण १७ कॉल्स खरातला साधारण मोबाईलवरून झाले. यामध्ये १० इनकमींग आणि 7 आऊट गोईंग कॉल्सचा समावेश होता. याशिवाय, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार हे मंत्रीद्वय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचेही खरात याच्यासोबत संभाषण झाल्याचे दमानिया म्हणाल्या. खारात्च्या जमीन खरेदी प्रकरणातील दिपक लोंढे याचे १८९ कॉल्स झाले, ज्याचा अवधी ३० हजार ५२९ सेकंद एवढा दर्शवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, खरात याला कतार, युएस, व्हर्जीन आयलंड या देशातूनही कॉल्स आले आहेत, अशी माहिती दमानिया यांनी दिली.
यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि खाराटची चौकशी करणाऱ्या एसआयटी प्रमुख यांना दिल्याचेही दमानिया यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.