
- शाळेत पोहोचताच आणि शाळा सुटताच पालकांच्या मोबाईलवर क्षणार्धात संदेश
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपक्रमशील शिक्षिका कुंदा बच्छाव यांचा अभिनव ‘स्मार्ट अटेंडन्स’ उपक्रम
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : महानगरपालिका शाळा क्रमांक १८, आनंदवली येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्या सुरक्षिततेलाही सर्वोच्च प्राधान्य देत नेहमीच नावीन्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. याच परंपरेत आणखी एक अभिनव पाऊल टाकत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘स्मार्ट अटेंडन्स’ हा अत्याधुनिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
शाळेत मुलगा किंवा मुलगी सुरक्षितपणे पोहोचली का? शाळा सुटल्यानंतर ती घरी निघाली का? अशा असंख्य प्रश्नांनी दिवसभर कष्ट करणारे पालक सतत चिंतेत असतात. अनेकदा पालकांचे शिक्षकांना वारंवार फोन येत असत. या चिंतेची जाणीव ठेवून आणि पालकांना मानसिक दिलासा मिळावा या उद्देशाने उपक्रमशील शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा अनोखा उपक्रम साकारला.
या उपक्रमासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला RFID Reader Card असलेले स्मार्ट ओळखपत्र (ID Card) देण्यात आले आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावर विशेष स्कॅनिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे. विद्यार्थी सकाळी शाळेत प्रवेश करताच आपले स्मार्ट कार्ड मशीनवर स्कॅन करतात आणि काही क्षणांतच पालकांच्या मोबाईलवर “Student Reached School” असा संदेश पोहोचतो. त्याचप्रमाणे शाळा सुटल्यावर पुन्हा कार्ड स्कॅन होताच “Student Left School” असा संदेश पालकांना तत्काळ प्राप्त होतो.
या तंत्रज्ञानामुळे पालकांची आपल्या मुलांबाबतची अनावश्यक चिंता दूर झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. आनंदवली परिसरातील पालकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत शाळेच्या नावीन्यपूर्ण कार्याचे भरभरून कौतुक केले आहे.
विशेष म्हणजे, अनेक नामांकित इंग्रजी माध्यमांच्या आंतरराष्ट्रीय शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची अशी स्मार्ट आणि तत्काळ संदेश देणारी व्यवस्था अद्याप उपलब्ध नसताना, नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक १८, आनंदवली ही असा उपक्रम प्रभावीपणे राबविणारी पहिली महानगरपालिका शाळा ठरली आहे.
या अभिनव उपक्रमाचे महानगरपालिका प्रशासन अधिकारी डॉ. मीता चौधरी यांनी विशेष कौतुक केले असून शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन या उपक्रमाला लाभले आहे.
उपक्रमाबाबत बोलताना शिक्षिका कुंदा बच्छाव म्हणाल्या :
“शाळेतील अनेक विद्यार्थ्यांचे पालक दिवसभर मोलमजुरी किंवा कामानिमित्त घराबाहेर असतात. विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेची चिंता त्यांच्या मनात कायम असते. ‘माझं मूल शाळेत सुरक्षित पोहोचलं का?’, ‘शाळा सुटल्यावर घरी निघालं का?’ या प्रश्नांनी ते अस्वस्थ होत असतात. पालकांची ही चिंता तंत्रज्ञानाच्या मदतीने कशी दूर करता येईल, हा विचार माझ्या मनात अनेक दिवस होता. त्यातूनच ‘स्मार्ट अटेंडन्स’ ही संकल्पना जन्माला आली. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि पालकांचा विश्वास हेच या उपक्रमामागचे खरे प्रेरणास्थान आहे.”
पालक रूपाली भालेकर म्हणतात :
“माझा मुलगा शाळेत पोहोचताच माझ्या मोबाईलवर लगेच संदेश येतो. त्यामुळे मी दिवसभर निश्चिंतपणे माझे काम करू शकते. माझा मुलगा अशा आधुनिक, सुरक्षित आणि विद्यार्थीकेंद्रित शाळेत शिकतो याचा मला खूप अभिमान वाटतो. मुलांच्या हितासाठी येथील शिक्षक सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असतात, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.”
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत “शिक्षणासोबत सुरक्षा” हा नवा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम, नाशिक महानगरपालिका शाळांच्या नवोन्मेषी वाटचालीतील आणखी एक प्रेरणादायी मैलाचा दगड ठरत आहे.
Comments are closed.