
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा ॲक्शन मोडवर
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात उद्या मंगळवारी तीव्र ढगफुटी होण्याची दाट शक्यता असून, एकाच दिवसात तब्बल 300 मिमी इतका विक्रमी पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याबाबतची माहिती देत नाशिक जिल्ह्याला सर्वात महत्त्वाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे ॲक्शन मोडवर आली आहे.
फडणवीस म्हणाले, उद्या सर्वात महत्त्वाचा अलर्ट नाशिकला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दरम्यानच्या भागात उद्या ढगफुटी संभावित आहे. त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत. ही मोठी ढगफुटी असू शकते, जवळपास 300 मिमी पाऊस ढगफुटीमुळे या भागात होऊ शकतो. नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागात ढगफुटी होऊ शकते, त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी केलेली आहे. नाशिक शहर किंवा नाशिक जिल्हा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ढगफुटीमुळे जी परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्याची पडताळणी करून बऱ्याचशा उपायोजना करण्यात आलेल्या आहेत. यावर आपल्याला अतिशय करडी नजर ठेवावी लागणार आहे.
पाच तालुक्यांत शाळा-महाविद्यालये बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीची भीती असल्याने खबरदारी म्हणून उद्या नाशिक शहर वगळून ग्रामीण भागात त्र्यंबक आणि इगतपुरी भागात शाळा आठवडे बाजार पूर्णपणे बंद राहणार आहेत, अशी घोषणा नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली आहे. ते म्हणाले की, उद्या हवामान विभागाने ढगफुटीचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जाणे टाळावे. त्र्यंबकेश्वर देवस्थान तसेच सप्तशृंगी देवीचे मंदिर बंद उद्यापासून परवा सकाळपर्यंत बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील दिंडोरी, नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी आणि पेठ तालुक्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सु्ट्टी जाहीर केली आहे.
पर्यटनेस्थळेही बंद
ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची असे काही रस्ते बंद करणार येणार असून त्याची माहिती यादी पीडब्ल्यूडी विभाग, पोलीस, राष्ट्रीय महामार्गाकडे असणार आहे. दरम्यान दुगारवाडी धबधबा, हरिहर गड, पहिने, पर्यटने स्थळे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद असणार आहे. असे आदेश वनपरीक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी दिले आहेत. नाशिकमध्ये उद्या असणाऱ्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे. शिवाय खबरदारी म्हणून ठिकठिकाणी होमगार्ड तैनात असणार आहे. नाशिक शहरात SDRF तैनात आहेत. रेल्वे विभागाला सतर्क राहण्यास सांगितलं आहे. विशेषतः इगतपुरी तालुक्यात खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. तर नागरिकांनी सतर्क राहा आणि धबधबे, किल्ले, डोंगरावर कुठेही फिरायला जाऊ नका असे आवाहन त्यांनी केलं आहे.
Comments are closed.