NGN News
Latest Marathi News

जादूटोण्याच्या भीतीने आधी बलात्कार, नंतर जबरदस्तीने लग्न

  • सायखेड्यात भोंदुबाबला अटक: अंनिसच्या प्रयत्नांना यश

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक: धंद्यात बरकत व्हावी म्हणून पंचवटी येथील एक महिला सायखेडा जवळील एका भोंदूबाबा कडे गेली होती. भोंदू बाबाने जादूटोण्याची भीती घालून तिच्यावर बलात्कार केला व माझ्याशी लग्न केले नाही तर तुला जादूटोणा करून मारून टाकेल, असे धमकावुन पहिले लग्न झाले असूनही पीडितेशी लग्न केले. भोंदूगिरीला विरोध केल्याने भोंदूने पोडितेस जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने पीडितेने गुन्हा दाखल केला. सदर भोंदू बाबाला सायखेडा पोलीसांनी अटक केली आहे. भोंदू अशोक खरात नंतर नाशिक जिल्ह्यातील हा आठवा गुन्हा आहे.

प्राप्त माहितीनुसार, पंचवटी येथील एक महिला चहाचे दुकान चालवत होती. पण ते जास्त चालत नव्हते. धंद्यात बरकत व्हावी म्हणून ओळखीच्या लोकांनी तिला दारणा सांगवी येथील भोंदूबाबा यौवन भानुदास गोवाड संपर्क करून दिला. भोंदूबाबाने तिला मंतरलेले तांदूळ, कडक उद जाळून त्याची दुकानात धुनी दिली आणि मंतरलेल्या पाचोळ्याची, जडीबुटीची पूड पाकीट ठेवल्याने व्यवसायाची भरभराट होईल, असे खोटे सांगून यौवन गोहाड या भोंदूबाबाने सदर महिलेला फसविले. तिच्याकडून तीन हजार रुपये घेतले. काही दिवसांनंतर तिला माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाही तर जादूटोणा करून मारून टाकेल, अशी धमकी देवून तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून, तिच्यावर बलात्कार केला.नंतर तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले.

नंतर मात्र घरातच भोंदूगिरी करणे सदर महिलेस आवडत नव्हते म्हणून तिने त्याला विरोध केला असता तिला लाथा बुक्क्यांनी मारणे, धमकी देणे असे अमानुष प्रकार या भोंदूबाबाने सुरू केले. दोन-तीन वर्ष हा अमानुष छळ या पीडित महिलेने सोसला. मात्र तीन-चार दिवसांपूर्वी या भोंदूबाबाने त्याच्या एक वर्षाच्या मुलाचा व या पीडित महिलेचा म्हणजे स्वतःच्या पत्नीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.तिने कसेबसे स्वतःला वाचवले आणि नातेवाईकांना बोलवून ती त्यांच्याकडे गेली. तिच्या नातेवाईकांसह पीडित महिलेने महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला.त्यानुसार महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सदर पीडित महिलेला घेऊन नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण यांचे कार्यालय गाठले.आणि सदर घटनेचा सखोल तपास करून संबंधित भोंदू विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी सायखेडा पोलीस स्टेशनला दिले.

त्याप्रमाणे सदर भोंदू विरोधात जादूटोणाविरोधी कायदा तसेच अन्य कायद्यानुसार सायखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी सदर भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत. यौवन गोहाड या भोंदूने आजपर्यंत अनेक व्यक्तींना, कुटुंबांना मंत्र तंत्र, जादूटोणा करण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या प्रकारे फसवून त्यांचे शोषण केले असण्याचा संशय महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे. अशा फसवणूक व शोषण झालेल्या पीडित व्यक्तींनी धाडसाने पोलिसांमध्ये तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे,जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, प्रल्हाद मिस्त्री, कृष्णा चांदगुडे आदींनी केले आहे.

Comments are closed.