NGN News
Latest Marathi News

चर्चा गीतेंच्या विजयाची आणि शिवसेनेच्या तत्परतेची देखील ! ( प्रासंगिक/मिलिंद सजगुरे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क

आगामी जिल्हा परिषद निवडणूक लागण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि मिनी मंत्रालयाचा पाईक होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या गोकुळ गीते यांना थेट विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाची लॉटरी लागली. केवळ बाजार समिती सदस्यत्व एव्हढीच जमेची बाजू असताना आणि फार मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना गीते यांनी ‘जायंट किलर’ ठरत इतिहास घडवला. त्यांच्या असामान्य विजयाची अवघ्या राज्यभर चर्चा झाली. तशाच चर्चेच्या परिघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची तत्परता देखील आली. आपला अधिकृत उमेदवार पराभूत झालेला असताना त्याच्या पराभवाच्या कारणांचे ‘पोस्टमार्टेम’ करण्याऐवजी, त्याच्याशी चर्चा करण्याऐवजी त्याच्या विरोधात विजयश्री प्राप्त केलेल्या उमेदवाराला थेट विमान धाडून ‘रेड कार्पेट’ टाकण्याची पक्षाची भूमिका अनेकांना आश्चर्यकारक वाटली असल्यास नवल नाही. शेवटी उगवत्या सूर्याला प्रणिपात करण्याची राजकीय परंपरा यानिमित्त अव्याहत ठेवली गेली, असे म्हणण्यास पुरेपूर वाव मिळावा.

‘अथ’पासून ‘इति’पर्यंत कमालीच्या अनिश्चितता आणि संशयी वातावरणाच्या हिंदोळ्यावर झुललेली म्हणून नाशिकच्या इतिहासात या निवडणुकीची नोंद झाली. गणेश आणि गोकुळ हे गीते बंधू, उदय सामंत, गिरीश महाजन आणि दादा भुसे हे मंत्रीत्रय तसेच महायुती उमेदवार नरेंद्र दराडे या सहा व्यक्तींच्या भोवती ही निवडणूक केंद्रित होती. जिल्ह्यातील छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ या ज्येष्ठ मंत्र्यांना ‘पिक्चर’मध्ये येवू न देण्याची प्रारंभीपासून दक्षता घेण्यात आली. महायुतीच्या इतर आमदारांची तर गणनाही नव्हती. कपाळी भाजपचा शिक्का असल्याने गणेश गीतेंना माघार घ्यावी लागली, पण धाकटे बंधू गोकुळ यांना माघारीचा अंतिम दिन टळल्यानंतर मंत्रीत्रयींच्या उपस्थितीत ‘प्रचार थांबवतो आहे’ असे सार्वजनिक विधान करायला लावून मूठ सोडवून घेण्याचा गणेश गीते यांनी पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, मतपत्रिकेत अखेरपर्यंत नाव राहणार असल्याने दराडे यांना गीतेंची वाटणारी भीती वास्तवात उतरली. दराडे यांना ‘कात्रजचा घाट’ दाखवत गोकुळ गीते विजयरथावर आरूढ झाले.

वस्तुतः, ४६६ मतांचे संपुट सोबत असताना दोनशेहून अधिक मते फुटलीत आणि अधिकृत उमेदवार पराभूत झालेला असताना महायुतीत किमान आरोप-प्रत्यारोपांचे रणकंदन होणे अपेक्षित होते. शिस्तीच्या म्हणवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची किमान एखादी संतप्त प्रतिक्रिया येते का, याकडे लक्ष लागून असताना प्रत्यक्षात काहीच आदळआपट झाली नाही. बरं, ज्या एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा उमेदवार अनपेक्षित पराभवाचा धनी झाला, त्या शिंदेनीही संताप व्यक्त करण्याऐवजी मंत्री सामंतांच्या माध्यमातून थेट विमानाची तजवीज करत आपल्याच पराभूत उमेदवाराला चीतपट करणाऱ्या गीतेंना पायघड्या टाकल्या. अधिकृत उमेदवार हरला असला तरी निवडून आलेला शिलेदार आपल्याच तंबूत आल्याने शिंदे-सामंत सुखावलेले दिसले. एकूणच निकालानंतरच्या घडामोडी अचंबित करणाऱ्या ठरल्या. पराभवानंतर संतप्त झालेल्या दराडे बंधूनी तीन बड्या नेत्यांसह महायुतीच्या तीनही पक्षांतील मतदारांना धक्कादायक निकालासाठी जबाबदार ठरवले. आता हे नेते आणि मतदार कोण, याची भविष्यात चौकशी होते की नेहमीप्रमाणे ‘ झाले गेले गंगेला मिळाले’ च्या अव्यक्त भूमिकेत राहणे महायुतीचे शीर्षस्थ नेतेमंडळी पसंत करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Comments are closed.