NGN News
Latest Marathi News

खा. राजाभाऊ वाजे यांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत


* दिल्लीतील नाट्यमय घडामोडींनंतर आगमन; नाशिक रोड रेल्वे स्थानकावर ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी


** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : दिल्लीतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे शुक्रवारी सकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. ठाकरे गटातील काही खासदारांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारल्याच्या चर्चांदरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या वाजे यांचे नाशिक रोड रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले.
स्थानक परिसर ढोल-ताशांच्या गजराने आणि घोषणाबाजीने दणाणून गेला होता. मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांनी फुलांचा वर्षाव करत वाजे यांचे स्वागत केले. त्यांच्या आगमनावेळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

दिल्लीतील घडामोडींनंतर ठाकरे गटातील काही खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनाही पक्षांतरासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न झाल्याची चर्चा होती. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटातील दोन पदाधिकारी सिन्नर येथील वाजे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यांनी वाजे यांचे वडील प्रकाश वाजे यांची सुमारे दोन तास भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाजे कुटुंबाने पक्षांतराचा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावत पक्षनिष्ठा कायम राखली.

नाशिकमध्ये आगमनानंतर माध्यमांशी संवाद साधताना खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. “ज्या विचारधारेतून मी निवडून आलो, त्या विचारधारेप्रती मी प्रामाणिक आहे. मी घेतलेला निर्णय योग्य असल्याची पावती आज कार्यकर्त्यांच्या प्रेमातून मिळत आहे. मी प्रामाणिकपणे माझे काम करत आहे. कार्यकर्त्यांचे प्रेम आधीही होते, मात्र आता ते अधिक वाढले आहे. मला कोणतीही ऑफर मिळाली नव्हती. मला जे हवे आहे ते मला मिळत आहे आणि तेच माझ्यासाठी खूप आहे,” असे वाजे यांनी सांगितले.
दरम्यान, वाजे यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला उत्साह व्यक्त केला. दिल्लीतील घडामोडींनंतर ठाकरे गटात राहण्याचा निर्णय घेतलेल्या वाजे यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे यावेळी दिसून आले.

Comments are closed.