
- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा इशारा; महावितरण कंपनीला निवेदन सादर
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरात ग्राहक संमतीविना स्मार्ट तथा प्रीपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरु असून तिला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा प्रखर विरोध आहे. असे विनापरवाना बसवलेले मीटर तत्काळ बदलून जुने मीटर पूर्वस्थितीत बसवण्यात यावेत, अशी मागणी पक्षाच्या वतीने महावितरण कंपनीला निवेदन देऊन करण्यात आली.
नाशिक रोड येथील महावितरण मुख्य अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे : शहरात ग्राहक संमतीविना स्मार्ट तथा प्रीपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरु आहे. अनेक ठिकाणी ती पूर्ण देखील झाली आहे. तथापि. त्याविरोधात नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात अवाढव्य वाढ झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर विनापरवाना बसवलेले मीटर तत्काळ बदलण्यात यावेत. त्याजागी जुने मीटर पूर्वस्थितीत बसवण्यात यावेत. सदर मागणीची पूर्तता न झाल्यास पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
निवेदनावर पक्षाचे सचिव तानाजी जायभावे, विभाग सचिव दिनेश सातभाई, दगडू व्हडगर, एकनाथ इंगळे, आत्माराम डावरे, मोहन जाधव, सतीश खैरनार, दीपक कोर, हिरामण तेलोरे, राहुल गायकवाड, स्वरूप वाघ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Comments are closed.