NGN News
Latest Marathi News

कोणतीही तडजोड नाही : गोकुळ गीते; म्हणाले, दराडे निष्क्रिय !

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : मागच्या सहा वर्षांत नरेंद्र दराडे यांनी कुठलेही काम केलेले नाही. त्यांच्या निष्क्रीयतेमुळेच आपण निवडणूक रिंगणात उतरल्याचा दावा अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी आज केला. मी आपल्या निर्णयावर ठाम असून निवडणुकीत कोणतीही तडजोड करणार नाही, अशी आक्रमक भूमिकाही गीते यांनी जाहीर केली. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीच्या दराडे यांच्याविरोधात गीते यांनी शड्डू ठोकले आहे. गीते यांनी माघार घेत दराडे यांना पाठींबा द्यावा, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरु असताना आज गीते यांनी भूमिका जाहीर केली. दराडे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवताना गीते म्हणाले, सोशल मीडियावर माझ्या सात पिढ्यांचा उद्धार करायचा आणि अंगलट आल्यावर दिलगिरी व्यक्त करायची ही कोणती संस्कृती आहे, असा सवाल करीत गीते यांनी आपण त्यांना कधीही पाठींबा देऊ शकत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.

मध्यस्थांमार्फत प्रलोभने

गेल्या आठ दिवसांपासून मला निवडणुकीत थांबवण्यासाठी विविध मध्यस्थांमार्फत प्रलोभने दाखवली जात आहेत. पण मला मी भूमिकेवर ठाम आहे, मी भीक घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. आपण भाजपमध्ये कधीही सक्रीय नव्हतो, केवळ बंधू गणेश गीते यांच्या वेळोवेळी झालेल्या निवडणुकीत पडद्यामागे राहून भूमिका बजावत होतो. त्यामुळे बंडखोर म्हणून मला संबोधले जाऊ नये, असे आवाहनही गीते यांनी केले.

Comments are closed.