
- गोकुळ गीतेंची उमेदवारी कायम; बोडके, म्हैसधुणे यांचे अर्जही मागे
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात बंडखोरी करू पाहणारे भाजपचे गणेश गीते अखेर माघारीसाठी राजी झाले. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या मनधरणी नंतर आपण माघार घेतल्याचे गीते यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. आपल्याला पक्ष नेतृत्वाने शब्द दिल्याचे सांगत गीते यांनी गेल्या शनिवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर महायुतीत बंद झाल्याची राज्यभर चर्चा असताना गीते यांनी मुंबईत बुधवारच्या महाजन यांच्या भेटीनंतर आपला पवित्र बदलला.
गेल्या काही तासांपासून मुंबईत झालेल्या मॅरेथॉन बैठका आणि चर्चेनंतर हा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. गीते यांनी आधी घेतलेल्या बंडाच्या भूमिकेमुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री उदय सामंत यांनी यासाठी नाशकात धाव घेत गीते आणि इतर बंडोबांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गीते यांनी सामंत यांना अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. हा वाद थेट मुंबई दरबारी पोहोचल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः लक्ष घातले. बुधवारी मुंबईत गिरीश महाजन, निलेश बोरा आणि गणेश गीते यांच्यात दीर्घ चर्चा झाली. महाजन यांनी गीते यांना येत्या काळात तुमचे योग्य राजकीय पुनर्वसन करु, असे आश्वासन दिल्याची माहिती आहे. त्यानंतर गीते माघार घेण्यास राजी झाल्याचे मानले जाते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गोरख बोडके आणि विष्णुपंत म्हैसधुणे यांनीही निवडणुकीतून माघार घेतली.
गोकुळ गीते महायुतीचे गणित बिघडवणार?
दरम्यान, गणेश गीते यांनी नमते घेतले असले, तरी त्यांचे लहान बंधू गोकुळ गीते यांनी माघार न घेण्याच्या भूमिकेमुळे नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. गोकुळ गीते हे गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यांनी या निवडणुकीची मोठी तयारी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत माघार नाही, अशी त्यांची भूमिका कायम राहिली. गोकुळ गीते रिंगणात राहिल्याने महायुतीच्या मतांमध्ये फूट पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गोकुळ गीते हे ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत.
Comments are closed.