
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन
** एनजीएन न्यूज नेटवर्क
सटाणा : श्रीकांत रौंदळ
आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनाविषयी आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालय आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील 18 राज्यांतील 75 एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयांमध्ये (EMRS) स्पेस लॅबची स्थापना करण्यात आली आहे. या स्पेस लॅबचे उद्घाटन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले.
या उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील पाच EMRS विद्यालयांचा समावेश असून त्यात EMRS अजमेर सौंदाणे, EMRS चणकापूर, EMRS मवेशी, EMRS देवाडा आणि EMRS धारणी या विद्यालयांचा समावेश आहे. या सर्व विद्यालयांपैकी EMRS अजमेर सौंदाणे येथील अत्याधुनिक स्पेस लॅबचे उद्घाटनही याच कार्यक्रमात करण्यात आले.
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यालयातील स्पेस लॅबमध्ये करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सुरेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्साहाने ऑनलाईन सहभाग नोंदविला. या प्रसंगी शिक्षक शंतनू जाधव, सुरेश पवार, गोविंद जोशी, रामलाल, विकास पवार, रोहित, सचिन आदि उपस्थित होते.
सुमारे 12 कोटी रुपयांच्या CSR निधीतून साकारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा लाभ देशातील 50 हजारांहून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना होणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मान्यताप्राप्त संस्थांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या स्पेस लॅबमध्ये LVM3 प्रक्षेपण वाहन, PSLV, GSLV, उपग्रह मॉडेल्स, खगोलशास्त्र प्रदर्शन, स्टार ट्रॅकर दुर्बिणी, CanSat मॉडेल्स तसेच विविध STEM शैक्षणिक साधनांचा समावेश करण्यात आला आहे.
या स्पेस लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग, निरीक्षण, सिम्युलेशन आणि मॉडेल-आधारित शिक्षणाचा अनुभव मिळणार असून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, विश्लेषणात्मक विचारशक्ती, समस्या निराकरण क्षमता आणि नवोन्मेषी विचारसरणी विकसित होण्यास मदत होणार आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी अंतराळ विज्ञान, उपग्रह तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्रातील संधींबाबत विशेष उत्सुकता व्यक्त केली. आदिवासी विद्यार्थ्यांना आधुनिक STEM शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या ऐतिहासिक उपक्रमामुळे EMRS अजमेर सौंदाणे विद्यालयाला आधुनिक विज्ञान शिक्षणाची नवी दिशा मिळाली असून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Comments are closed.