NGN News
Latest Marathi News

आंदोलकांकडून प्रांताधिकारी पवन दत्तांच्या ‘पिंडदाना’चा प्रयत्न

  • पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे उधळला; महिला शेतकऱ्यांना मारहाणीचा आरोप; रिंग रोडविरोधात प्रशासनाचा निषेध

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : शहरातील प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनी बुधवारी रामकुंड परिसरात प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्या निषेधार्थ ‘पिंडदान’ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत हा प्रकार रोखला. या घटनेमुळे रामकुंड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराभोवती उभारण्यात येणाऱ्या रिंग रोड प्रकल्पासाठी प्रशासनाकडून भूसंपादन आणि जमिनीची मोजणी प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. रिंग रोडच्या कामाविरोधात बाधित शेतकरी गेल्या चार दिवसांपासून रामकुंड परिसरात आमरण उपोषण करत आहेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी पवन दत्ता यांनी जमिनीची मोजणी सुरू असताना महिला शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आंदोलकांनी प्रतीकात्मक स्वरूपात पिंडदान आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, या प्रकरणाने काही दिवसांपूर्वी राजकीय स्वरूपही धारण केले होते. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनही दिले होते.

रामकुंड परिसरात सुरू असलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाने गोदावरी घाट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांनी पिंडदानाचा प्रयत्न रोखण्यात यश मिळवले असले, तरी प्रांत अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही आणि रिंग रोड प्रश्नावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.

Comments are closed.